गाझाच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये विध्वंस; जखमी, आजारी लोकांवर कुठे केले जाताहेत उपचार?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 05:50 PM2023-11-17T17:50:55+5:302023-11-17T17:58:00+5:30

Israel Palestine Conflict : गाझा पट्टीतील बहुतांश रुग्णालये या हल्ल्यात उद्ध्वस्त झाली आहेत किंवा त्यांच्याकडे वैद्यकीय साहित्य शिल्लक राहिलेलं नाही.

gaza hospital suspends operations al shifa under israel | गाझाच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये विध्वंस; जखमी, आजारी लोकांवर कुठे केले जाताहेत उपचार?

गाझाच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये विध्वंस; जखमी, आजारी लोकांवर कुठे केले जाताहेत उपचार?

गाझातील सर्वात मोठं रूग्णालय अल-शिफामध्ये इस्रायली सैन्य IDF ने प्रवेश केला आहे. रुग्णालयातून रुग्णांना पळवून लावून हमास आपलं हेडक्वार्टर बनवत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तेथूनच सर्व हल्ले होत होते. इस्रायलच्या या दाव्यांदरम्यान सर्वात मोठ्या रुग्णालयाची अशी भयंकर अवस्था झाल्यानंतर पॅलेस्टिनी नागरिक उपचारासाठी कुठे जातात, असा प्रश्नही उपस्थित होत आहे, गाझा पट्टीतील बहुतांश रुग्णालये या हल्ल्यात उद्ध्वस्त झाली आहेत किंवा त्यांच्याकडे वैद्यकीय साहित्य शिल्लक राहिलेलं नाही.

7 ऑक्टोबर रोजी इस्रायली लोकांवर अचानक झालेल्या हल्ल्यानंतर इस्रायलने हमासचा खात्मा करण्याचा निर्धार केला आहे. हवाई हल्ल्यानंतर जमिनीवर हल्लेही सुरू झाले. गाझा पट्टीतील रुग्णालयांवरही त्याचा परिणाम होत आहे. रुग्णालयात उपकरणांसाठी पुरेसे इंधन नाही. आयडीएफचं म्हणणं आहे की हल्ल्यापूर्वी गाझा पट्टीतील मुलांना तेथून बाहेर काढा. याशिवाय इस्रायल सरकारने अल-शिफासह अनेक रुग्णालयांना सुमारे 300 लीटर इंधनही दिलं होतं. 

इस्रायलने सैनिकांना इंधन पुरवतानाचा व्हिडिओही जारी केला होता. पण त्यानंतर हमासने त्यांची मदत नाकारल्याचं सांगण्यात आलं. रुग्णालयांऐवजी त्यांनी स्वत: इंधन ठेवलं. इस्रायलच्या म्हणण्यानुसार हमास रुग्णालयांच्या नावाखाली कमांड सेंटर चालवत आहे. गेल्या महिन्यात अल-अहली अरब हॉस्पिटलमधील बॉम्बस्फोटही हमासनेच घडवून आणले होते. गाझा पट्टीतील रुग्णालये एकापाठोपाठ एक काम करणं थांबवत आहेत. 

लढाई सुरू झाल्यापासून, तेथील 30 पैकी 21 रुग्णालयांनी काम करणं बंद केलं आहे. तेथील काही लहान मुलांच्या रुग्णालयांपैकी एक असलेल्या अल-रंतिशीलाही हल्ल्याचा फटका बसला. यानंतर रुग्णांना तेथून शेजारच्या जॉर्डनमध्ये नेण्यात आले. कमल अदवान या उत्तर गाझामधील आणखी एका रुग्णालयाने काही दिवसांपूर्वी आपलं काम थांबविण्याची घोषणा केली कारण त्यांच्याकडे वैद्यकीय पुरवठा शिल्लक नव्हता. इंधन आणि पुरवठ्याच्या कमतरतेमुळे बहुतांश रुग्णालये बंद होत आहेत.

गाझा पट्टीतील उर्वरित रुग्णालये ओव्हरलोड आहेत. अनेक लोक दक्षिण गाझाकडे पळत आहेत. शेजारी देशही काही प्रमाणात मदत करत आहेत. उदाहरणार्थ, जॉर्डनने दोन देशांच्या सीमेवर फील्ड हॉस्पिटल बांधलं. कॅम्पसारखं स्ट्रक्चर आहे. जिथे डॉक्टर आणि सुविधा पुरवल्या जात आहेत. यूएई आणि तुर्की देखील राफा सीमेवर अशी रुग्णालये बांधू शकतात.

गंभीर आजारांनी ग्रस्त लोकांना इजिप्तमध्ये पाठवलं जात आहे. फक्त एक आठवड्यापूर्वी, WHO च्या मदतीने कॅन्सरग्रस्त मुलांना गाझामधून इजिप्त आणि इतर शेजारच्या देशांमध्ये हलवण्यात आलं. वैद्यकीय पुरवठा करण्यासाठी किंवा रुग्णांना फ्री पॅसेज देण्यासाठी इस्रायल देखील दररोज सुमारे 4 तास युद्ध थांबवत आहे, परंतु हे काही क्षेत्रापुरतं मर्यादित आहे.
 

Web Title: gaza hospital suspends operations al shifa under israel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.