गाझा पेटले, इस्रायल - पॅलेस्टाइन संघर्ष पुन्हा उफाळला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2018 04:25 PM2018-05-15T16:25:53+5:302018-05-15T16:25:53+5:30
गाझामध्ये इस्रायल-पॅलेस्टाइन असा संघर्ष पुन्हा एकदा उफाळला आहे. अमरिकेने आपला राजदुतावास तेल अविवमधून जेरुसलेमला आणण्याचा निर्णय घेतल्यानंतर येथे तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.
गाझा सिटी- सोमवारी इस्रायली फौजांकडून मारल्या गेलेल्या पॅलेस्टीनी नागरिकांच्या मृत्युबद्दल गाझामध्ये आज बंद पाळण्यात आला. 2014नंतर अशी तणावाची स्थिती पुन्हा एकदा निर्माण झाली आहे.
अमेरिकेने जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून दर्जा देण्याचे निश्चित केल्यापासूनच या परिसरात तणाव वाढीस लागला होता. त्यातच सोमवारी तेल अविवमधून अमेरिकेने आपला राजदुतावास जेरुसलेमला आणण्याचे निश्चित केले होते. त्यामुळे या तणावात अधिकच भर पडली. पॅलेस्टिनी लोकांनी या घटनेचा निषेध करण्यासाठी एकत्र निदर्शने सोमवारी केली. सोमवारी इस्रायली फौजांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्यामधये 58 पॅलेस्टिनी नागरिकांचे प्राण गेले आहेत तर 2700 नागरिक जखमी झाले आहेत. या मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.
संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने या गंभीर परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली होती. कालचा सोमवार पॅलेस्टिनी लोकांसाठी अत्यंत घातक ठरला. इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये 2014 साली झालेल्या लढाईनंतर असा गंभीर प्रसंग पहिल्यांदाच घडला आहे. 58 मृतांमध्ये 6 लहान मुलांचा समावेश आहे आणि अश्रूधुरामुळे एका बाळाचे प्राणही गेले आहेत.
इस्रायलकडून प्रत्युत्तरात 2700 लोक जखमी झाले. त्यातील 1360 लोक थेट गोळीबारामुळे जखमी झाले तर 130 लोकांची स्थिती अत्यंत गंभीर आहे. गाझामध्ये आधीच वैद्यकीय सेवा अपुऱ्या आहेत, त्यातच इतक्या मोठ्या संख्येने जखमी रुग्णालयात आल्यामुळे वैद्यकीय सेवेवर प्रचंड ताण आला आहे. जेरुसलेमला इस्रायलच्या राजधानी दर्जा देण्यास इतर देशांनी अद्याप नकार दिला आहे. अमेरिकेत ट्रम्प प्रशासनाने इस्रायलच्या बाजूने निर्णय घेत आपला दुतावास तेल अविववरुन हलविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मध्य-पुर्वेत अशांतता निर्माण झालीच त्याहून अमेरिकेवर सर्व बाजूंनी टीकाही होऊ लागली. इतर देशांनी मात्र आपापले दुतावास तेल अविवमध्येच ठेवले आहेत.