अमेरिकेत आंदोलकांकडून महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2020 03:23 PM2020-06-04T15:23:07+5:302020-06-04T15:30:09+5:30
अमेरिकेच्या भारतातील राजदुतांनी मागितली माफी; पोलिसांकडून शोध सुरू
वॉशिंग्टन: पोलिसांच्या ताब्यात असताना मृत पावलेल्या जॉर्ज फ्लॉएड यांना न्याय मिळावा यासाठी अमेरिकेत अनेक ठिकाणी आंदोलनं सुरू आहेत. राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये काही आंदोलकांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना केली. फ्लॉएड यांच्या मारेकरी पोलिसांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी वॉशिंग्टनमध्ये गेल्या काही दिवसांपासून 'ब्लॅक लाईव्ह्ज मॅटर' आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यान काहींनी महात्मा गांधींच्या पुतळ्याचं नुकसान केलं. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
या घटनेबद्दल भारतातील अमेरिकेच्या राजदुतांनी दु:ख व्यक्त केलं. त्यांनी या प्रकाराबद्दल माफीदेखील मागितली. जॉर्ज फ्लॉएड यांच्या मृत्यूनंतर अमेरिकेत आंदोलनांनी जोर धरला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी राजधानीत मोठ्या प्रमाणात नॅशनल गार्ड्स तैनात केले आहेत. व्हाईट हाऊस परिसरातील आंदोलकांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईचं ट्रम्प यांनी समर्थन केल्याची माहिती व्हाईट हाऊसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. वॉशिंग्टनमधल्या कारवाईनंतर संपूर्ण देशासमोर एक उदाहरण असेल, असं ट्रम्प यांनी म्हटल्याचं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं.
वर्चस्व कायम ठेवणारं सुरक्षा दल गरजेचं असल्याचं ट्रम्प म्हणाले. देशातील कायदा सुव्यवस्था कायम राखण्याची आवश्यकता आहे. ट्रम्प यांनी देशभरातील आंदोलनांसाठी अप्रत्यक्षपणे डेमोक्रॅटिक पक्षाला जबाबदार धरलं. ज्या ठिकाणी आंदोलनं सुरू आहेत, त्या ठिकाणी रिपब्लिकन पक्ष सत्तेत नाही. तिथे डेमोक्रॅटिक पक्षाची सत्ता आहे, असं ट्रम्प यांनी म्हटलं.
कोरोनाच्या संकटात अमेरिका मैत्री निभावणार; भारताला 'ही' मदत करणार
लॉकडाऊनमध्ये काय चुकलं? राहुल गांधींशी चर्चेदरम्यान राजीव बजाज यांनी नेमकं कारण सांगितलं
केरळमध्ये आणखी एका हत्तीची हत्या?; फटाक्यांचाच वापर केल्याचा संशय