सायबर हल्ल्यांमुळे जर्मन उद्योगाला तब्बल ५० अब्ज डॉलरचा फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 02:55 AM2018-09-14T02:55:54+5:302018-09-14T02:56:12+5:30
जर्मनीमधील दोन तृतीयांश वस्तू उत्पादक कंपन्यांवर सायबर हल्ले
बर्लिन : जर्मनीमधील दोन तृतीयांश वस्तू उत्पादक (मॅन्युफॅक्चर) कंपन्यांवर सायबर हल्ले झाले असून, त्यामुळे या कंपन्यांना तब्बल ६३ अब्ज युरो म्हणजेच ५० अब्ज डॉलरचा फटका बसला आहे.
जर्मनीची आयटी क्षेत्रातील संघटना बिटकॉमने केलेल्या सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे. युरोपातील सर्वांत मोठी अर्थव्यवस्था असलेल्या जर्मनीच्या वस्तू उत्पादन क्षेत्रातील ५०३ कंपन्यांचे सर्वोच्च व्यवस्थापक आणि सुरक्षा प्रमुखांची मते या सर्वेक्षणात जाणून घेण्यात आली. अर्थव्यवस्थेचा कणा असलेले छोटे आणि मध्यम उद्योग सायबर हल्ल्यांना सर्वाधिक बळी पडत असल्याचे सर्वेक्षणात आढळले आहे. बिटकॉमचे प्रमुख अचिम बर्ग यांनी सांगितले की, जागतिक बाजारात नेतृत्वस्थानी असल्यामुळे जर्मन उद्योगांत सायबर गुन्हेगारांना विशेष रस आहे. सायबर सुरक्षा आणि गुंतवणूक, अशा दोन्हींकडे अधिक लक्ष द्यायला हवे.सर्वेक्षण अहवालात म्हटले आहे की, जर्मन सुरक्षा अधिकारी दीर्घकाळापासून सायबर हल्ल्याच्या धोक्याबाबत सावध करीत आहेत. जर्मनीला जगात निर्यातदार देश बनविणाऱ्या वस्तू उत्पादन क्षेत्रातील तंत्रज्ञान चोरण्यासाठी विदेशी गुप्तहेर संस्था या हल्ल्यांमागे आहे.