भारताच्या दोन मित्रांचा इरादा पक्का; शेवटच्या क्षणी चीनला जोरदार धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2020 02:19 PM2020-07-02T14:19:24+5:302020-07-02T14:21:59+5:30
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत प्रस्ताव मांडणाऱ्या चीनला रोखलं; दोनदा आक्षेप घेत भारताच्या मदतीला धावले दोन देश
नवी दिल्ली: संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत चीनला जोरदार धक्का बसला आहे. पाकिस्तानच्या कराची शेअर बाजारावर सोमवारी दहशतवादी हल्ला झाला. त्या हल्ल्याचा निषेध करत चीन भारताविरोधी मोर्चेबांधणी करण्याच्या प्रयत्नात होता. त्याबद्दलचा प्रस्ताव चीनकडून संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत मांडली जाणार होता. मात्र अमेरिकेनं अगदी शेवटच्या क्षणी आक्षेप नोंदवला. त्यामुळे चीनला जोरदार झटका बसला.
पाकिस्तानच्या कराची शेअर बाजारावर सोमवारी दहशतवादी हल्ला झाला. त्याबद्दलचा प्रस्ताव चीनकडून मांडण्यात येणार होता. मात्र दोन देशांनी त्याला आक्षेप घेतला. अमेरिकेनं अचानक आक्षेप घेत चीनचा प्रयत्न हाणून पाडला. त्याआधी जर्मनीनं मंगळवारी जर्मनीनं चीनला प्रस्ताव मांडण्यापासून रोखलं. चीन प्रस्ताव मांडण्याच्या तयारीत असताना जर्मनीनं आक्षेप नोंदवला. त्यामुळे चीनला प्रस्ताव सादर करता आला नाही.
याआधी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी कराची शेअर बाजारातील हल्ल्यासाठी भारताला जबाबदार धरलं. या हल्ल्यात चार सुरक्षा कर्मचाऱ्यांसह एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. तर चार दहशतवादी मारले गेले. चीननं या हल्ल्याबद्दल दु:ख व्यक्त करत पाकिस्तानसोबतचे आपले मजबूत संबंध दाखवण्यासाठी एक प्रस्ताव तयार केला होता. चीननं मंगळवारी संध्याकाळी हा प्रस्ताव सादर केला. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत न्यूयॉर्कमधील स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी ४ वाजेपर्यंत कोणीही आक्षेप न घेतल्यास त्या कराराला मंजुरी मिळते.
मंगळवारी संध्याकाळी ४ वाजता जर्मनीनं प्रस्तावाला आक्षेप नोंदवला. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दहशवतवादी हल्ल्यासाठी भारताला जबाबदार धरलं आहे. आम्हाला हे मान्य नाही, असा आक्षेप जर्मनीनं घेतला. त्यानंतर लगेचच चिनी राजदूतांनी जोरदार विरोध केला. या दरम्यान घड्याळाचा काटा ४ च्या पुढे गेला. त्यानंतर प्रस्तावाची डेडलाईन १ जुलै सकाळी १० पर्यंत करण्यात आली.
सुरक्षा परिषदेत दुसऱ्या दिवशी पुन्हा चीनकडून प्रस्ताव मांडण्यात आला. घड्याळाचा काटा १० च्या जवळ जाताच अमेरिकेनं आक्षेप नोंदवला. त्यामुळे चीनला पुन्हा धक्का बसला. आता चीनकडून पुन्हा हा प्रस्ताव मांडला जाण्याची शक्यता आहे. मात्र चीन आणि पाकिस्तानला दोन देशांनी धक्का दिला आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही देश भारतासाठी धावून आले आहेत.