जर्मनीने उभारली जगातील पहिली हायड्रोजन रेल्वे यंत्रणा, पर्यावरण रक्षणासाठी उचलले मोठे पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 06:25 AM2022-08-29T06:25:00+5:302022-08-29T06:25:35+5:30
Hydrogen Rail System: पर्यावरण रक्षणासाठी हायड्रोजनवर चालणाऱ्या रेल्वेचे जाळे (नेटवर्क) उभारणारा जर्मनी हा जगातील पहिला देश ठरला आहे. या देशातील लोअर सॅस्कोनी राज्यामध्ये ही रेल्वे यंत्रणा कार्यान्वित झाली.
बर्लिन : पर्यावरण रक्षणासाठी हायड्रोजनवर चालणाऱ्या रेल्वेचे जाळे (नेटवर्क) उभारणारा जर्मनी हा जगातील पहिला देश ठरला आहे. या देशातील लोअर सॅस्कोनी राज्यामध्ये ही रेल्वे यंत्रणा कार्यान्वित झाली असून, त्याची चार वर्षांपूर्वीपासून पूर्वतयारी सुरू होती. प्रदूषणरहित रेल्वे यंत्रणा उभारण्याच्या दिशेने जर्मनीने टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल आहे.
फ्रान्सची कंपनी अल्सटमने हायड्रोजनवर चालणाऱ्या ट्रेन बनविल्या असून, त्या जर्मनीत चालविल्या जातात. सध्या तिथे अशा पाच ट्रेन असून, या वर्षअखेर त्यांची संख्या चौदापर्यंत जाईल. या ट्रेन बनविण्यासाठी जर्मन रेल्वे व अल्सटम कंपनीमध्ये ७४३ कोटी रुपयांचा करार झाला आहे. (वृत्तसंस्था)
ध्वनिप्रदूषणही होणार अतिशय कमी
लोअर सॅक्सोनी राज्याचे मंत्री स्टीफन वेईल यांनी सांगितले की, पर्यावरण रक्षणासाठी जर्मनीचा हायड्रोजनवर चालणाऱ्या रेल्वेचा प्रकल्प मैलाचा दगड बनणार आहे. या ट्रेनमधून होणारे ध्वनिप्रदूषणही अतिशय कमी आहे.
कार्बनडाय ऑक्साइड उत्सर्जनात होणार ४४०० टनांनी घट
अल्सटम कंपनीने म्हटले आहे की, हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या रेल्वेमुळे कार्बनडाय ऑक्साइडच्या उत्सर्जनात ४४०० टनांनी घट होणार आहे.
या ट्रेनचा कमाल वेग ताशी १४० किमी आहे, तसेच या ट्रेनमुळे दरवर्षी १०.६ लाख लिटर डिझेलची बचत होणार आहे. हायड्रोजन इंधनावरील रेल्वे जाळ्यामुळे जर्मनीच्या अर्थव्यवस्थेलाही मोठा फायदा होणार आहे.
डिझेल ट्रेनची खरेदी करणार नाही
nजर्मन रेल्वेचे प्रवक्ता डिर्क अल्टविग यांनी सांगितले की, आमचा देश भविष्यात डिझेलवर चालणाऱ्या ट्रेन खरेदी करणार नाही. सध्या डिझेलवर चालणाऱ्या ट्रेनचे कालांतराने हरित इंधनावर चालणाऱ्या ट्रेनमध्ये रूपांतर करण्यात येईल.
nहरित वायूंच्या उत्सर्जनात २०३० पर्यंत ६५ टक्के कपात करण्याचे उद्दिष्ट जर्मनीने राखले आहे. हरित वायूंच्या उत्सर्जनाच्या १९९० च्या आकडेवारीच्या तुलनेत हे लक्ष्य ठरविण्यात आले आहे.