German election: जर्मनीमध्ये सत्तांतर अटळ! अँजेला मर्केल यांचा पक्ष पराभवाच्या छायेत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 09:38 AM2021-09-27T09:38:25+5:302021-09-27T09:38:54+5:30
Angela Merkel party lost in Germany election: गेल्या 16 वर्षांत अँजेला मर्केल या जर्मनीच्या प्रमुख राहिल्या आहेत. त्या चार वेळा चान्सेलर म्हणून निवडल्या गेल्या होत्या. 2018 मध्येच त्यांनी पाचव्यांदा मी या स्पर्धेत नसेन असे म्हटले होते.
जर्मनीमध्ये रविवारी संसदेसाठी झालेल्या मतदानाचे निकाल हाती येऊ लागले आहेत. यामध्ये सोशल डेमोक्रेटिक पक्षाला सर्वाधिक जागा मिळत आहेत. मर्केल यांच्या पक्षाला 2005 नंतर मोठा झटका बसला असून हा पक्ष नेतृत्व करण्याच्या स्थितीमध्ये नाहीय. यामुळे मर्केल यांची 16 वर्षांची सत्ता संपुष्टात येण्याची शक्यता आहे. (Angela Merkel's Party Narrowly Loses To Rivals In Germany Election)
सेंटर लेफ्ट सोशल डेमोक्रेटिक (एसपीडी) ला 25.5 टक्के मते मिळाली असून मर्केल यांच्या सीडीयू, सीएसयू कंझर्व्हेटीव्ह आघाडीला 24.5 टक्के मते मिळाली आहेत. कोणत्याही राजकीय पक्षाला पूर्ण बहुमत मिळणार नसून नवीन सरकार सत्तेत येण्यासाठी आघाडी करण्यावर भर दिला जाईल. यामध्ये ग्रीन्स आणि लिबरल फ्री डेमोक्रेटिक (एफडीपी) सहभागी होण्याची शक्यता आहे. सोशल डेमोक्रेटिकचे चान्सेलर उमेदवार ओलाफ स्कोल्ज यांनी आपल्या समर्थकांना सांगितले की निश्चितपणे ही एक मोठी निवडणूक संध्या असेल.
गेल्या 16 वर्षांत अँजेला मर्केल या जर्मनीच्या प्रमुख राहिल्या आहेत. त्या चार वेळा चान्सेलर म्हणून निवडल्या गेल्या होत्या. 2018 मध्येच त्यांनी पाचव्यांदा मी या स्पर्धेत नसेन असे म्हटले होते. यामुळे जर्मनीच्या लोकांनी रविवारी त्यांचा उत्तराधिकारी निवडण्यासाठी मतदान केले. हे मतदान विरोधी गटाच्या पारड्यात पडले. अंजेला यांचा पक्ष पार्टी क्रिश्चियन डेमोक्रेटिक यूनियन (सीडीयू) कडून आर्मिन लाशेत हे मैदानात उतरले आहेत. तर मर्केल यांच्याच सरकारमधील अर्थ मंत्री आणि व्हाईस चान्सेलर सोशल डेमॉक्रेटीक पक्षाचे नेते ओलाफ शोल्ज मुख्य विरोधी म्हणून मैदानात उतरले होते.