जर्मनीही मंदीच्या विळख्यात; जगभरात उमटणार पडसाद, जीडीपीमध्ये सलग दुसऱ्या तिमाहीत घट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2023 06:30 AM2023-05-26T06:30:44+5:302023-05-26T06:30:51+5:30
जर्मनीच्या सांख्यिकी विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, २०२३ च्या पहिल्या तिमाहीत जर्मनीचे सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) ०.३ टक्क्यांनी घसरले आहे.
बर्लिन : युरोपातील सर्वांत मोठी अर्थव्यवस्था असलेल्या जर्मनी मंदीत ढकलला गेला आहे. जर्मनीच्या अर्थव्यवस्थेत सलग दुसऱ्या तिमाहीत ०.३ टक्के घट झाली आहे. गुरुवारी जाहीर झालेल्या आर्थिक आकडेवारीतून ही माहिती समोर आल्यानंतर जर्मनीतील मंदीवर शिक्कामोर्तब झाले आहे. जर्मनीची अर्थव्यवस्था ही युरोपमधील सर्वात मोठी आणि जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. त्यामुळे तेथील मंदीचा जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर जर्मनीतील मंदी जगाच्या चिंतेचे कारण बनली आहे.
जर्मनीच्या सांख्यिकी विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, २०२३ च्या पहिल्या तिमाहीत जर्मनीचे सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) ०.३ टक्क्यांनी घसरले आहे. त्याआधी २०२२च्या शेवटच्या तिमाहीत जर्मनीचा जीडीपी ०.५ टक्क्यांनी घसरला होता. जानेवारी महिन्यात जर्मनीच्या जीडीपीमध्ये ०.४ टक्के वाढीचा अंदाज हाेता. मात्र, या अंदाजावर फेरविचार करावा लागणार आहे. यापूर्वी कोरोनामुळे २०२० मध्ये जर्मनीमध्ये मंदी आली होती. (वृत्तसंस्था)
महागाईने कंबरडे मोडले
जर्मनीत महागाईने कळस गाठल्यामुळे लोकांनी खर्चात कपातीचे धोरण स्वीकारले आहे. खाद्यान्न महागाईचा दर १६%पेक्षा जास्त आहे. तर एकूण महागाई ७%पेक्षा जास्त आहे. त्यामुळे पारिवारिक वस्तू वापर (हाउसहोल्ड कंझम्प्शन) १.२ टक्के घटला आहे. याचा परिणाम म्हणून औद्योगिक उत्पादनात मोठी घट झाली आहे.
रशिया-युक्रेन युद्धाचा फटका
n युक्रेन-रशिया युद्ध हे जर्मनीतील मंदीचे मुख्य कारण आहे. या युद्धामुळे रशियातून होणारा गॅसपुरवठा थांबल्यामुळे जर्मनीला मोठा फटका बसला आहे.
n जर्मनी गॅसपुरवठ्याच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात रशियावर अवलंबून आहे. गॅसपुरवठा थांबल्यामुळे जर्मनीतील औद्योगिक उत्पादन ठप्प झाले आहे. त्यातून निर्यात घटली. जर्मनीची अर्थव्यवस्था निर्यातीवरच अवलंबून असल्यामुळे अंतिमत: मंदीचा शिरकाव झाला.
कशी ठरते मंदी?
सलग दोन तिमाहीत अर्थव्यवस्थेत नकारात्मक वाढ नाेंदविल्यास मंदीचा शिरकाव झाल्याचे मानले जाते. मंदी निश्चित करण्याचा हा आंतरराष्ट्रीय मानक आहे. जर्मनीत सलग दोन तिमाहीत अर्थव्यवस्था वाढत घट झाल्यामुळे मंदीवर अधिकृतरीत्या शिक्कामोर्तब झाले आहे.
तज्ज्ञ काय म्हणतात?
आयएनजी बँकेचे मॅक्रो हेड कर्स्टन ब्रेझस्की यांनी सांगितले की, सौम्य हिवाळी हवामान आणि कोविडनंतर पुरवठा साखळीत सुधारणा होण्याच्या मार्गातील अडथळे यामुळे जर्मनीची अर्थव्यवस्था मंदीच्या बाहेर राहण्यात अपयशी ठरली आहे.
याआधी केव्हा
आली होती मंदी?
याआधी कोरोना साथीच्या काळात २०२० च्या सुरुवातीला जर्मनीत मंदी आली होती. व्यापक प्रमाणावरील लॉकडाऊनमुळे तेव्हा जर्मनीच्या अर्थव्यवस्थेला धक्का बसला होता.
मंदीच्या शक्यतेचा अंदाज...
भारत ०%
इंडाेनेशिया २%
साैदी अरब ५%
चीन १२.५%
ब्राझिल १५%
स्पेन २५%
मेक्सिकाे २७.५%
द. काेरिया ३०%
जपान ३५%
रशिया ३७.५%
ऑस्ट्रेलिया ४०%
फ्रान्स ५०%
कॅनडा ६०%
इटली ६०%
जर्मनी ६०%
अमेरिका ६५%
न्यूझीलंड ७०%
ब्रिटन ७५%