कोरोना प्रतिबंधात्मक लस घ्या आणि मोफत घेऊन जा लाखोंची कार; 'या' देशात मिळतेय अनोखी ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 07:21 PM2021-06-15T19:21:04+5:302021-06-15T19:26:07+5:30
Coronavirus Vaccine : कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतल्यानंतर आता नवी कार घरी घेऊन जाण्याची संधी मिळणार आहे. लसीकरण मोहीम धीमी झाल्यानं घेण्यात आला निर्णय.
कोरोनाच्या महासाथीनं संपूर्ण जगालाच हादरवून सोडलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जगभरात लसीकरण मोहीम राबवली जात आहे. परंतु रशियानं आपल्या देशात लसीकरण मोहिमेला चालना देण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे. जे कोणी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतील त्यांना नवी कोरी कार देण्यात येईल, अशी घोषणा मॉस्कोच्या महापौरांनी केली.
मीडिया रिपोर्ट्सनुसार गेल्या रविवारी महापौर सर्गेई सोबयानिन (Sergei Sobyanin) यांनी यासंदर्भातील घोषणा केली आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लस घेणाऱ्यांना १० लाख रूपयांपर्यंतची कार देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यामुळे लोकांना नवी कारही मिळेल आणि लसीकरणाचा दरही वाढवण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी लसीकरणाची प्रक्रिया धीमी झाली होती.
"१४ जूनपासून जे कोणी नागरिक ज्यांचं वय १८ वर्षांपेक्षा अधिक आहे त्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली तर त्यांना योजनेचा भाग बनता येईल. हे सर्वच लोकं लकी ड्रॉमधून कार मिळवण्यासाठी पात्र आहेत," असं सर्गेई सोबयानिन यांनी सांगितलं. ही स्कीम ११ जुलै पर्यंत सुरू राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. 'लकी ड्रॉ'च्या माध्यमातून जवळपास २० कार मोफत देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यापैकी ५ कार्स पुढील आठव़ड्यात वितरीत करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.