विजय मल्ल्याचे जहाज विकून कर्ज चुकते करा- लंडन कोर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2020 12:09 AM2020-01-29T00:09:15+5:302020-01-29T00:13:45+5:30
विजय मल्ल्याला हा आणखी एक धक्का बसला असून, हे जहाज त्याच्या आवडीचे असल्याचे मानले जाते.
लंडन : भारतातील बँकांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावून विदेशात पलायन केलेला मद्य व्यावसायिक विजय मल्ल्या याचे आलिशान जहाज विकून बँकेचे कर्ज चुकते करण्याचा आदेश लंडन हायकोर्टाच्या एडमिरल्डी डिव्हिजनमधील सुनावणीत न्या. निग्ले टीज यांनी दिला. दी फोर्स असे या जहाजाचे नाव आहे व विजय मल्ल्याचा मुलगा या जहाजाचा कायदेशीर मालक आहे.
विजय मल्ल्याला हा आणखी एक धक्का बसला असून, हे जहाज त्याच्या आवडीचे असल्याचे मानले जाते. हे जहाज विकून मिळणाऱ्या रकमेतून कतार नॅशनल बँकेचे ६० लाख युरोचे कर्ज चुकते करण्यात यावे, असे कोर्टाने सोमवारच्या आदेशात म्हटले आहे. कर्जासाठी दिलेल्या हमीमध्ये मल्ल्याद्वारे दिलेली व्यक्तिगत हमीही समाविष्ट आहे.
जहाज मल्ल्याच्या मुलाचे असले तरी आपला उद्देश कर्जाची वसुली करणे हा आहे, असे बँकेने सुनावणीदरम्यान कोर्टासमोर सांगितले. कोर्टाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, जहाजाचा मालक या प्रकरणात प्रतिवादी आहे. तो सुनावणीच्या काळात न्यायालयात हजर राहिला नाही. (वृत्तसंस्था)
लवकरच जहाजाचे मूल्यांकन
कतार नॅशनल बँकेकडून घेतलेल्या या कर्जाचा हमीदार विजय मल्ल्या आहे. नियमानुसार, हे कर्ज २०१५ पर्यंत परत केले जाणे अपेक्षित होते; परंतु तसे झाले नाही. त्यानंतर जानेवारी २०१८ मध्ये जहाज जप्त करण्यात आले. हे जहाज सध्या साऊथ हॅम्पटन बंदरावर निगराणीत उभे आहे. कोर्टाने नियुक्त केलेले अॅडमिरल मार्शल पॉल फॉरेन कर्जवसुलीसाठी जहाजाचे मूल्यांकन करतील व त्यानंतर विक्रीची प्रक्रिया सुरू होईल.