पाकिस्तानात अडकलेल्या उज्माचा भारतात परतण्याचा मार्ग मोकळा
By Admin | Published: May 24, 2017 12:38 PM2017-05-24T12:38:18+5:302017-05-24T12:41:36+5:30
बंदुकीच्या धाकावर लग्नास भाग पाडलेल्या उज्मा या भारतीय महिलेला बुधवारी इस्लामाबाद उच्च न्यायालयाने मायदेशात परतण्याची परवानगी दिली.
ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 24 - बंदुकीच्या धाकावर लग्नास भाग पाडलेल्या उज्मा या भारतीय महिलेला बुधवारी इस्लामाबाद उच्च न्यायालयाने मायदेशात परतण्याची परवानगी दिली. न्यायाधीश मोहसीन अख्तर यांनी उज्माच्या याचिकेवर सुनावणी केली. ताहीर या पाकिस्तानी नागरीकाबरोबर उज्माचा विवाह झाला होता. बंदुकीच्या धाकावर लग्नास भाग पाडल्याने उज्माने पतीविरोधात इस्लामाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
सुनावणीच्यावेळी उज्माने ताहीरला भेटण्याची आपल्याला अजिबात इच्छा नसल्याचे न्यायालयाला सांगितले. न्यायाधीशांनी उज्माला भारतात परतण्याची परवानगी दिल्यानंतर तिला आपल्या चेह-यावरचा आनंद लपवता आला नाही. न्यायालयाने उज्माला वाघा बॉर्डरपर्यंत सुरक्षा देण्याचेही आदेश दिले.
उज्माच्या जीवाला धोका असल्याने ती इस्लामाबादमधील भारतीय दूतावासामध्ये राहत होती. जो पर्यंत भारतात परतण्याची परवानगी मिळणार नाही तो पर्यंत तिने दूतावास सोडण्यास नकार दिला होता. पाकिस्तानातील पतीनं भारतीय उच्चायुक्तालयावरच भारतीय पत्नीला ताब्यात घेतल्याचा आरोप केला होता. आम्ही दोघेही व्हिसा घेण्यासाठी भारतीय दूतावासात गेलो होतो. त्यावेळी पत्नी अचानक बेपत्ता झाली, असं ताहीरने सांगितले होते.
उज्मा आणि ताहिर अली यांची ओळख मलेशियामध्ये झाली होती. त्याच वेळी दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळून आले. त्यानंतर उज्मा 1 मे रोजी वाघा-अटारी सीमेवरून पाकिस्तानात दाखल झाली आणि त्यांनी 3 मे रोजी निकाह केला. मात्र पाकिस्तानी वृत्तपत्र न्यूज इंटरनॅशनलच्या रिपोर्टनुसार, दोघे जण उच्चायुक्तालयात गेले होते. त्यावेळी त्यांनी स्वतःचा व्हिसा फॉर्म आणि फोन अधिका-यांकडे सुपूर्द केला.
अधिका-यांनी बोलावल्यानंतर उज्मा बिल्डिंगच्या आत गेली, तिचा पती त्यावेळी बाहेरच होता. ब-याच वेळ झाला तरी उज्मा न आल्यानं अखेर पतीनं बिल्डिंगमध्ये प्रवेश केला. मात्र भारतीय उच्चायुक्तालयानं उज्मा इथे नसल्याचं सांगितलं. तसेच अधिका-यांनी त्यांचे तीन मोबाईल फोनही परत केले नाहीत.