...आता मस्क यांना मिळतायत जीवे मारण्याच्या धमक्या; ट्रम्प यांना काय काय सांगितलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 22:53 IST2025-02-27T22:52:35+5:302025-02-27T22:53:04+5:30
"संघीय घाटा कमी करणे, हे DOGE चे मुख्य उद्दीष्ट होते. आपण एक ट्रिलियन डॉलरपेक्षाही अधिक खर्च करत आहोत. जर हे असेच सुरूच राहीले तर देश खरोखरच दिवाळखोर बनेल. याला कुठलाही पर्याय नाही. ही एक अत्यंत आवश्यक गोष्ट आहे आणि यामुळेच मी येथे आहे."

...आता मस्क यांना मिळतायत जीवे मारण्याच्या धमक्या; ट्रम्प यांना काय काय सांगितलं?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पदाचा दुसरा कार्यकाळ सुरू केल्यानंतर बुधवारी पहिल्यांदाच मंत्रीमंडळाची बैठक घेतली. या बैठकीत ट्रम्प यांनी युक्रेन युद्धापासून ते कॅनडा आणि मेक्सिकोवर लादलेल्या टॅरीफसारख्या निर्णयांवरही चर्चा करण्यात आली. या बैठकीत ट्रम्प यांचे जवळचे मानले जाणारे तथा ट्रम्प सरकारमध्ये डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सीचे (DOGE) सल्लागार असलेले इलॉन मस्क देखील उपस्थित होते. यावेळी मस्क यांनी एक मोठा दावा केला आहे. परदेशी निधीमध्ये कपात करण्याच्या आणि हजारो संघीय कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्याच्या DOGE च्या निर्णयांवरून, सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचे मस्क यांनी म्हटले आहे.
यावेळी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी मस्क यांना DOGE च्या कामासंदर्भात आपले विचार माडण्यास सांगितल्यानंतर, मस्क यांनी हा दावा केला. मस्क म्हणाले, "संघीय घाटा कमी करणे, हे DOGE चे मुख्य उद्दीष्ट होते. आपण एक ट्रिलियन डॉलरपेक्षाही अधिक खर्च करत आहोत. जर हे असेच सुरूच राहीले तर देश खरोखरच दिवाळखोर बनेल. याला कुठलाही पर्याय नाही. ही एक अत्यंत आवश्यक गोष्ट आहे आणि यामुळेच मी येथे आहे."
मस्क पुढे म्हणाले, "यामुळे मला प्रचंड टीकेला सामोरे जावे लागत आहे. मला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. मात्र, आपण असे केले नाही, तर अमेरिका दिवाळखोर बनेल. आपण एक ट्रिलियन डॉलर्स वाचवण्याचा एक मार्ग शोधू शकतो."
यावेळी ट्रम्प पुन्हा एकदा मस्क यांचे कौतुक करतानाही दिसले. दरम्यान, मंत्रिमंडळ बैठकीनंतर ट्रम्प प्रशासनाने संघीय संस्थांना मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करण्याचा आदेश दिला. ट्रम्प यांनी पदभार स्वीकारल्यापासून, देशातील सुमारे २.३ मिलियन संघीय कर्मचाऱ्यांपैकी १ लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली आहे.