फ्लोरिडामध्ये दिसली डायनोसॉरसारखी महाकाय मगर; गोल्फ मैदानावरील व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2020 12:58 AM2020-11-14T00:58:24+5:302020-11-14T07:03:17+5:30
लोकांचे डोळे विस्फारले; गोल्फ मैदानावरील व्हिडिओ व्हायरल
फ्लोरिडा : इटा वादळाचा बुधवारी तडाखा बसलेल्या अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यामध्ये त्या दिवशी एका गोल्फ मैदानात डायनोसॉरसदृश महाकाय आकाराची एक मगर फिरताना तेथील नागरिकांना दिसली. या मगरीचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर झळकला आहे.
फ्लोरिडा राज्यामध्ये १० लाखांहून अधिक मगरी आहेत. मात्र गोल्फ मैदानात फिरत असलेल्या मगरीचा महाकाय आकार बघून अनेकांचे डोळे विस्फारले. या मगरीचा व्हिडीओ गोल्फ क्लबमध्ये काम करणाऱ्या टायलर स्टॉल्टिंग या कर्मचाऱ्याने चित्रीत करून समाजमाध्यमांवर झळकविला. आपण आयुष्यात इतकी मोठी मगर पहिल्यांदाच बघितली असे स्टॉल्टिंगने म्हटले आहे.
स्टॉल्टिंगने चित्रीत केलेला महाकाय मगरीचा व्हिडीओ फ्लोरिडातील व्हॅलेन्सिया गोल्फ अँड कंट्री क्लबने आपल्या फेसबुक पेजवर शेअर केला. ही मगर नसून डायनोसॉर आहे अशाही प्रतिक्रिया या व्हिडीओवर काही जणांनी व्यक्त केल्या आहेत. फ्लोरिडात बुधवारी दिसलेल्या महाकाय मगरीचे त्यानंतर पुन्हा दर्शन झालेले नाही. मात्र गोल्फ क्लबमधील कर्मचारी व तेथील खेळाडूंना मगरींपासून सुरक्षित ठेवावे अशी अपेक्षाही अनेक जणांनी व्यक्त केली.