गिलगिट आणि बाल्टिस्तान हा भारताचा भाग, ब्रिटननं पाकिस्तानला फटकारलं
By admin | Published: March 26, 2017 02:27 PM2017-03-26T14:27:56+5:302017-03-26T14:32:01+5:30
गिलगिट आणि बाल्टिस्तान हा भारतातल्या जम्मू-काश्मीरचाच भाग आहे
ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 26 - गिलगिट आणि बाल्टिस्तान हा भारतातल्या जम्मू-काश्मीरचाच भाग आहे. या भागावर पाकिस्तानने केलेला कब्जा अवैध असल्याचा दावा ब्रिटनने केला आहे. गिलगिट आणि बाल्टिस्तान हे दोन्ही भूभाग भारताचेच आहेत. पाकिस्तानने तेथे बळजबरीनं ताबा मिळवल्याचं ब्रिटनने म्हटले आहे. ब्रिटनच्या संसदेमध्ये गिलगिट आणि बाल्टिस्तान हा भारतातच भाग असल्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीरच्या भारताच्या दाव्यांना अधिक ताकद मिळाली आहे.
ब्रिटनच्या संसदेमध्ये मंजूर झालेल्या ठरावानुसार काश्मीरमधील गिलगिट आणि बाल्टिस्तान या भागांवर भारताचा दावा असून, पाकिस्ताननं या भूभागांवर अवैध कब्जा केल्याचं या ठरावात म्हटलं आहे.
तसेच पाकिस्तानकडून पाचवा प्रांत म्हणून गिलगिट आणि बाल्टिस्तानवरचा दावा खोडून काढत ब्रिटनने पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. गिलगिट आणि पाकिस्तान हा भारतातील जम्मू-काश्मीरचा कायदेशीर आणि घटनात्मक भाग आहे, असेही संसदेत मांडण्यात आलेल्या प्रस्तावात स्पष्टपणे नमूद करण्यात आलंय. ब्रिटन संसदेत मंजूर झालेल्या या प्रस्तावामुळे भारताच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. तसेच पाकिस्तानला यामुळे चांगलीच चपराक बसल्याची चर्चा आहे. गिलगिट-बाल्टिस्तानवर भारताचा दावा असल्याचा प्रस्ताव ब्रिटनच्या संसदेमध्ये 23 मार्च रोजी मांडण्यात आला होता. त्यानंतर या प्रस्तावावर सभागृहात कंझर्वेटिव्ह पक्षाचे नेते बॉब ब्लॅकमेन यांनी भारताची बाजू घेत 1947च्या दरम्यानच पाकिस्तानने या भागावर अवैधरीत्या कब्जा केल्याची माहिती सभागृह सदस्यांना दिली. चर्चेनंतर या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आणि पाकिस्तानच्या कृतीचा सभागृहाने निषेधही केला. त्याचबरोबर या भागात पाकिस्तान आणि चीनच्या सहकार्याने सुरू असलेले चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर प्रकल्पाचेही कामही गैर असल्याचे ब्रिटनने स्पष्ट केले आहे.
त्यानंतर भारतानं पाकिस्तानच्या पाकव्याप्त काश्मीर, गिलगिट आणि बाल्टिस्तान दाव्यावर टीका केली आहे. पाकव्याप्त काश्मीर, गिलगिट आणि बाल्टिस्तान या भागांवर पाकनं मिळवलेला ताबा हा बेकायदा आहे. तो भाग आधी मुक्त करून काश्मीरला त्याच्या मूळ स्वरूपात आणू, असं वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी व्यक्त केलं आहे. काश्मीरची समस्या पाकनेच निर्माण केली असून, चीनच्या जिवावर पाकचे नेते बेताल वक्तव्ये करीत सुटले आहेत. पाकने पाकव्याप्त काश्मीर, गिलगिट आणि बाल्टिस्तान या काश्मीर राज्यांच्या भागांवर बेकायदेशीर ताबा मिळवला असून, जम्मू-काश्मीरमध्ये हिंसाचार माजविणा-या फुटीरतावाद्यांना पाकनेच गेली अनेक दशके खतपाणी घातले आहे. पाकच्या तावडीतून आम्ही संपूर्ण काश्मीरची मुक्तता करणार असून, या भागाचा भारतात पुन्हा समावेश करणार आहोत, असंही जितेंद्र सिंग म्हणाले आहेत.