अजब ! या तरुणीच्या शरिरातून घामाऐवजी वाहते रक्त, डॉक्टरही आश्चर्यचकित
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2017 05:28 PM2017-10-25T17:28:11+5:302017-10-25T17:29:44+5:30
इटलीमध्ये राहणा-या एक तरुणीला हा अजब आजार झाला असून, तिच्या शरिरातून घामाऐवजी रक्त वाहत असतं. जेव्हा कधी ही तरुणी एखादं मेहनतीचं काम करते, तेव्हा तिच्या शरिरातून घामाऐवजी रक्ताच्या धारा वाहतात.
कॅनडा - मेहनत केल्यावर शरिरातून घाम येणं यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. महेनतीचं काम केल्यानंतर थकवा येतो, सोबतच शरिरातून घामाच्या धारा वाहत असतात. पण जर का घामाऐवजी शरिरातून रक्त वाहू लागलं तर ....हे कसं काय शक्य आहे असं म्हणत असाल तर हे असं घडत आहे. इटलीमध्ये राहणा-या एक तरुणीला हा अजब आजार झाला असून, तिच्या शरिरातून घामाऐवजी रक्त वाहत असतं. जेव्हा कधी ही तरुणी एखादं मेहनतीचं काम करते, तेव्हा तिच्या शरिरातून घामाऐवजी रक्ताच्या धारा वाहतात. यामुळे तिचं संपुर्ण शरिर लाल होतं. जेव्हा तरुणीने आपल्या मित्र आणि कुटुंबियांना याबद्दल सांगितलं तेव्हा कोणीही तिच्यावर विश्वास ठेवला नाही. इतकंच नाही डॉक्टरांनीदेखील तिला खोटं ठरवंल. पण जेव्हा सत्य समोर आलं, तेव्हा सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला.
वैद्यकीय तपासणी केली असता तरुणीला एक गंभीर आजार असल्याचं समोर आलं आहे. कॅनडियन मेडिकल असोसिएशन जर्नल रिपोर्ट्सच्या डॉक्टरांनी या आजाराला ब्लड स्वेटिंग असं नाव दिलं आहे.
फ्लॉरेन्स युनिव्हर्सिटीच्या दोन डॉक्टरांनी या 21 वर्षीय तरुणीवर उपचार सुरु असल्याची माहिती दिली आहे. मात्र अद्यापही डॉक्टर यावर उपाय शोधू शकलेले नाहीत. डॉक्टरांनी ह्रदय आणि रक्तदाबावरील उपचार पद्धती अवलंबली असून, त्यानुसार उपचार करण्याचा प्रयत्न केला. पण यानंतरही तरुणीच्या शरिरातून होणार रक्तस्त्राव अद्याप थांबलेला नाही.
हॅमेटॉल्जिस्ट आणि वैद्यकीय जाणकार जॅकलिन डफीन यांच्यानुसार, डॉक्टरांसाठी अशा केसेस फार कठीण असतात. प्रत्येक डॉक्टर आपल्या पेशंटवर लवकराच लवकर उपचार करुन ठणठणीत करण्याचा प्रयत्न करत असतो. पण जेव्हा यश मिळत नाही, तेव्हा त्यांना प्रचंड दुख: होतं.