सेल्फीच्या नादात मैत्रिणीला रेल्वेची धडक, मुली तरीही सेल्फी काढण्यात मग्न
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2017 12:53 PM2017-12-20T12:53:05+5:302017-12-20T13:07:32+5:30
वेगवान रेल्वेसमोर सेल्फी घेण्याच्या प्रयत्नात एक मुलगी ब्रेन डॅमेजच्या उंबऱ्यावर उभी आहे. मुलीला अपघात झाला तरीही मैत्रिणी सेल्फी घेण्यात मग्न होत्या.
इंडोनेशिया : जगभरात सेल्फी काढण्याच्या नादात कित्येकांचे जीव गेले आहेत. त्यामुळे जिवावर बेतेल अशा ठिकाणी सेल्फी न काढण्याचे आवाहन वारंवार केले जाते. पण लोकं या सगळ्याकडे काना-डोळा करतात आणि शेवटी गोष्ट त्यांच्याच जीवावर बेतते. सेल्फी काढताना पाय घसरल्याने नदीत बुडणं, फेसबुक लाईव्ह करताना बोट अचानक पाण्यात बुडणं, अशा अनेक दुर्घटना घडल्याचं आपण ऐकलं आहे. म्हणूनच सेल्फी काढताना सावध राहा असं सांगण्यात येतं. पण मोठ्यांनी सांगितलेल्या गोष्टी तरुणाईने ऐकल्या हे तसं दुर्मिळच.
इंडोनेशियात असाच एक प्रकार समोर आलाय. सेल्फी काढताना ट्रेनने एका मुलीला धडक दिल्याने ती गंभीर जखमी झाली, मात्र तिच्या मैत्रिणी तरीही सेल्फी काढण्यात मग्न होत्या. डेलिमेलने दिलेल्या वृत्तानुसार, इंडोनेशियातील सेंट्रल जावा प्रोव्हिन्समधील रेल्वे रुळांवर काही मुली जमल्या होत्या. त्यांना जरा हटके सेल्फी काढायचा होता. त्यामुळे त्यांना धावत्या ट्रेनसमोर फोटो काढण्याचा प्रयत्न केला.
फोटो काढण्यासाठी इली हायती ही १६ वर्षांची तरुणी सगळ्यात मागे उभी राहिली. मागून ट्रेन आल्याने वाऱ्याच्या झटक्याने ती खालीच कोसळली आणि तिच्या डोक्याला जबर जखम झाली. हा सगळा प्रकार घडला तरीही तिच्या मैत्रिणी हसत-खेळत सेल्फी काढण्यातच मश्गुल होत्या. त्यांना थोड्यावेळाने हा सगळा प्रकार लक्षात आला. तत्काळ तिला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं. तिच्या डोक्यावर जबर जखम झाल्याने टाके पडले आहेत. डॉक्टरांनी अथक प्रयत्नाने तिचा जीव वाचवला असला तरीही तिचा कायमचा ब्रेन डॅमेज होण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे.
आणखी वाचा - असंवेदनशीलतेचा कळस! बेशुद्ध महिलेसोबत पादचारी सेल्फी काढण्यात मग्न
तिला झालेली जखम ट्रेनच्या धडकेमुळे झाली आहे की ट्रेनच्या हवेच्या झोतात खाली पडल्यावर दगडाला आपटल्याने झाली आहे हे अद्यापही कळू शकलेलं नाही. पोलिसांचे पथक याबाबत अधिक चौकशी करत आहेत.
मात्र जर या एवढ्याशा गोष्टीमुळे तिचा ब्रेन डॅमेज झाला तर स्वत:च्या अल्लडपणामुळेच तिनं तिचं आयुष्य धोक्यात घातलं असंच म्हणावं लागेल. म्हणूनच तुम्हीही सेल्फी काढताना जरा सावधानता बाळगा असंच सगळ्यांकडून सांगण्यात येतंय.
आणखी वाचा - सेल्फीने घेतला जीव, नदीत बुडून दोन तरुणींचा मृत्यू