धक्कादायक! बॉयफ्रेन्डसोबत बोलत होती म्हणून तरूणीला भर चौकात देण्यात आली क्रूर शिक्षा!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 12:49 PM2021-04-29T12:49:01+5:302021-04-29T12:58:01+5:30
एक तरूणी फोनवर बॉयफ्रेन्डसोबत बोलताना आढळून आली तर तिला तालिबानने क्रूर शिक्षा दिली. याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
एखादी मुलगी एखाद्या मुलासोबत फोनवर बोलत असेल तर ती एक सामान्य बाब आहे. पण अनेकदा अशा काही घटना समोर येतात की, असं करणं दोघांपैकी एकाला महागात पडतं. अफगानिस्तानातून एक अशीच विचित्र घटना समोर आली आहे. इथे एका तरूणीला तरूणासोबत फोनवर बोलणं महागात पडलंय.
'द सन' च्या रिपोर्टनुसार, ही घटना अफगाणिस्तानच्या हेरात प्रांतातील आहे. येथील हफ्तागोला नावाच्या ठिकाणी एक तरूणी फोनवर बॉयफ्रेन्डसोबत बोलताना आढळून आली तर तिला तालिबानने क्रूर शिक्षा दिली. याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
व्हायरल झालेल्या या व्हिडीओत दिसत आहे की, एका तरूणीला भर चौकात चाबकाने ४० फटके मारण्यात आले. जेव्हा तिला ही शिक्षा दिली जात होती तेव्हा जमलेले लोक तिचा व्हिडीओ काढत होते. मोठ्या संख्येने लोक तिथे ही शिक्षा बघण्यासाठी हजर होते आणि गपचूप सगळं बघत होते.
रिपोर्टनुसार, तरूणी तिच्या बॉयफ्रेन्डसोबत बोलत होती आणि असं करताना तिला कुणीतरी पाहिलं होतं. आधी तर तिला लोकांनी खूप ऐकवलं. नंतर स्थानिक लोक तिला शिक्षा देण्यासाठी तालिबानकडे घेऊन गेले. तिथे प्रकरण जाणून घेतल्यावर मौलाना यांनी तिला शिक्षा सुनावली.
मौलानांनी तरूणीला चाबकाचे फटके मारण्याची शिक्षा सुनावली. ही शिक्षा देण्यासाठी तरूणीला भर चौकात उभं केलं. नंतर फटके मारणाऱ्या व्यक्ती बोलवण्यात आलं. बघता बघता तरूणीला चाबकाचे ४० फटके मारण्यात आले. इतकेच नाही तर ही घटना तेथील लोकांनी कॅमेरात कैद केली. तरूणी लोकांकडे मदतीची भीक मागताना दिसली. ती तिची चूक मानत होती, रडत होती. आणि लोक तिचा व्हिडीओ तयार करत होते.
मीडिया रिपोर्टनुसार, या तरूणीला शरिया कायद्याविरोधात जाऊन आपल्या बॉयफ्रेन्डसोबत फोनवर बोलण्याची शिक्षा मिळाली. असे सांगितले जात आहे की, हा व्हिडीओ पहिल्यांदा १३ एप्रिलला फेसबुकवर शेअर करण्यात आला होता. काही रिपोर्ट्सनुसार ही घटना डिसेंबर महिन्यातील आहे.