Gita Gopinath कशा बनल्या IMF च्या चीफ इकॉनॉमिस्ट; वाचा का सोडणार त्या आपलं पद?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 10:49 AM2021-10-20T10:49:40+5:302021-10-20T10:50:11+5:30
IMF Gita Gopinath : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (International Monetary Fund) चीफ इकॉनॉमिस्ट गीता गोपीनाथ या पुढील वर्षी जानेवारी महिन्यात आपल्या पदावरुन हटणार आहेत.
गीता गोपीनाथ (Gita Gopinath) यांनी जानेवारी २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (International Monetary Fund) मुख्य आर्थिक सल्लागाराची जबाबदारी सांभाळली होती. यापूर्वी त्या हॉवर्ड युनिव्हर्सिटीमध्ये ज्वांस्त्रा प्रोफेसर ऑफ इंटरनॅशनल स्टडीज अँड इकॉनॉमिक्स या पदावर कार्यरत होत्या. IMF च्या मॅनेजिंग डायरेक्टर क्रिस्टलिना यांनी लवकरच गीता गोपीनाथ यांच्या उत्तराधिकाऱ्याची निवड प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याचं म्हटलं आहे. त्यांची कामगिरी इतकी चांगली होती की त्या या पदाच्या प्रमुख दावेदार होत्या. त्या जगातील सर्वोकृष्ठ अर्थतज्ज्ञांपैकी एक असल्याची प्रतिक्रिया क्रिस्टीन यांनी दिली. गीता गोपीनाथ यांनी विनिमय दर, व्यापार आणि गुंतवणूक, आंतरराष्ट्रीय आर्थिक संकटे, चलनविषयक धोरण आणि उदयोन्मुख बाजार संकटांवर ४० संशोधन लेख प्रकाशित केले आहेत. दरम्यान, त्या आता पुन्हा हॉवर्ड विद्यापीठात जाणार आहेत.
गीता गोपीनाथ यांचा जन्म कर्नाटकातील म्हैसूर येथे झाला. गीताचे आजोबा गोविंद नांबियार हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या खूप जवळचे मानले जात होते. त्यांची आजी देखील कम्युनिस्ट पक्षाचे नेते एके गोपालन यांची नातेवाईक होती. गीता यांनी बीएसचं शिक्षण घेतलं होतं आणि त्यानंतर दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये अर्थशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं. गीता यांचे पती इकबाल धालीवाल हेदेखील इकॉनॉमिक्स ग्रॅज्युएट आहेत आणि ते १९९५ च्या बॅचचे IAS टॉपरही आहेत. परंतु कालांतरानं त्यांनी आपली नोकरी सोडली आणि प्रिन्सटन येथे शिक्षण घेण्यास सुरूवात केली. गीता या त्यांच्या पतीसह आणि मुलासह केंब्रिज येथे वास्तव्यास आहेत.
IMF मध्ये कशा पोहोचल्या?
गोपीनाथ यांनी दिल्ली विद्यापीठातून बीए आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि वॉशिंग्टन विद्यापीठातून एमए केलं. त्यानंतर त्यांनी २००१ मध्ये प्रिन्सटन विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात पीएचडी केली. यानंतर, त्याच वर्षी त्यांनी शिकागो विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करण्यास सुरवात केली. याशिवा त्या हार्वर्ड विद्यापीठात इंटरनॅशनल स्टडिज अँड इकॉनॉमिक्सच्या जॉन जवांन्स्ट्रा प्राध्यापक राहिली आहे. त्यांचे संशोधन आंतरराष्ट्रीय वित्त आणि मॅक्रोइकॉनॉमिक्सवर केंद्रित आहे.
याशिवाय, त्या नॅशनल ब्युरो ऑफ इकॉनॉमिक रिसर्चमध्ये इंटरनॅशनल फायनॅन्स आणि मॅक्रोइकॉनॉमिक्स प्रोग्रामच्या सह-संचालक देखील राहिल्या आहेत. गोपीनाथ या अमेरिकन इकॉनॉमिक रिव्ह्यूच्या सह-संपादक, इंटरनॅशनल इकॉनॉमिक्सच्या विद्यमान हँडबुकच्या सह-संपादक आणि आर्थिक अभ्यासाच्या पुनरावलोकनाच्या संपादिका देखील राहिल्या आहेत.
IMF साठी काय केलं?
गीता गोपीनाथ यांनी IMF मध्ये अनेक मोठ्या गोष्टी केल्या आहेत. त्या महासाथीवरील पेपरच्या सह-लेखिका होत्या. या लेखात कोरोना महासाथ कशी दूर करायची आणि जागतिक स्तरावर कोरोना लसीकरणाची मोहीम कशी पूर्ण करावी याबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. यासोबतच गीता यांनी IMF मध्ये हवामान बदलसाठीच्या अभ्यासासाठी स्थापन करण्यात आलेल्या टीममध्ये आणि विश्लेषणात महत्वाची भूमिका बजावली.
भारतासाठी काय योगदान?
त्यांनी भारताच्या अर्थ मंत्रालयासाठी जी -20 प्रकरणांवर सल्लागार गटाच्या सदस्या म्हणूनही काम केलं आहे. २०१८ मध्ये त्यांची अमेरिकन अकॅडमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सच्या फेलो म्हणून निवड करण्यात आली. २०१७ मध्ये त्यांना वॉशिंग्टन विद्यापीठाचा विशिष्ट माजी विद्यार्थी पुरस्कार मिळाला. २०१४ मध्ये, आयएमएफने त्यांना टॉप २५ अर्थतज्ज्ञांपैकी एक म्हणून घोषित केले आणि २०११ मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने यंग ग्लोबल लीडर म्हणून त्यांची निवड केली.