८ अपत्यांना जन्म द्या, कुटुंब वाढवा! व्लादिमीर पुतीन यांचे रशियन महिलांना आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2023 06:13 AM2023-12-02T06:13:23+5:302023-12-02T06:13:49+5:30
Vladimir Putin : रशियातील महिलांनी प्रत्येकी किमान आठ अपत्ये जन्माला घालावीत व आपल्या कुटुंबाचा विस्तार करावा असे आवाहन रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी केले आहे.
रशियातील महिलांनी प्रत्येकी किमान आठ अपत्ये जन्माला घालावीत व आपल्या कुटुंबाचा विस्तार करावा असे आवाहन रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी केले आहे. वर्ल्ड रशियन पीपल्स कौन्सिलच्या (डब्ल्यूआरपीसी) मॉस्को येथे झालेल्या परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केले असून, ते व्हायरल होत आहे.
रशियातील ऑर्थोडॉक्स चर्चने आयोजिलेल्या या परिषदेला विविध सामाजिक संस्थांचे लोक उपस्थित होते. पुतीन यावेळी म्हणाले की, रशियाचा जन्मदर १९९०पासून सातत्याने घसरत आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात सुरू झालेल्या युक्रेन युद्धात रशियाच्या लष्कराचेही मोठे नुकसान व जीवितहानी झाली आहे.
त्यांनी सांगितले की, रशियामध्ये एका दांपत्याला चार, पाच किंवा त्याहून अधिक अपत्ये असण्याची परंपरा अद्यापही काही वांशिक गटांनी जोपासली आहे. काही दशकांपूर्वी आपली आजी, पणती यांना सात, आठ किंवा त्याहून अधिक अपत्ये असत. ही गोष्ट रशियातील नागरिकांनी लक्षात ठेवली पाहिजे असे पुतीन म्हणाले.
मोठी कुटुंबे ही रशियाच्या समाजजीवनाचा पुन्हा अविभाज्य घटक बनला पाहिजे. कुटुंबामुळे राज्य तसेच समाजाचा पाया रचला जातो हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. पुतीन यांचे हे भाषण त्यांच्या वेबसाइटवर झळकविण्यात आले आहे. रशियातील परंपरा येत्या काळात टिकवून ठेवणे आवश्यक आहे. त्यातूनच रशियाचे भवितव्य घडणार आहे असे व्लादिमीर पुतीन यांनी सांगितले.