"कमीत कमी 8 मुलं जन्माला घाला अन्...", राष्ट्रपती पुतिन यांनी महिलांना का केलं असं आवाहन?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 04:26 PM2023-12-01T16:26:35+5:302023-12-01T16:28:16+5:30
लांना किमान आठ मुले जन्माला घालण्याचे आणि मोठ्या कुटुंबांना पुन्हा एकदा आदर्श मानण्याचे आवाहन केले आहे.
रशियाचे राष्ट्रप्ती व्लादिमीर पुतिन यांनी आपल्या देशातील महिलांना एक विचित्र आवाहन केले आहे. वर्ल्ड रशियन पीपल्स काउंन्सिलमध्ये बोलताना पुतिन यांनी महिलांना किमान आठ मुले जन्माला घालण्याचे आणि मोठ्या कुटुंबांना पुन्हा एकदा आदर्श मानण्याचे आवाहन केले आहे. द इंडिपेंडंटच्या वृत्तानुसार, पुतीन यांच्या या विधानाचे अनेक अर्थ काढले जात आहेत. त्यांच्या या विधानामागचे एक कारण म्हणजे, 1990 च्या दशकापासून रशियाचा सातत्याने घसरत असलेला जन्मदर. यात कसल्याही प्रकारची सुधारणा झालेली नाही. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून देशात जवळपास तीन लाखांहून अधिक लोक मारले गेले आहेत.
'ही वेळ आपली आहे' -
रशियातील ऑर्थोडॉक्स चर्चचे प्रमुख पॅट्रिआर्क किरिल यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यात रशियातील अनेक पारंपरिक संघटनांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता. यावेळी पुतीन म्हणाले, पुढील अनेक वर्षांसाठी रशियाची लोकसंख्या वाढविणे हे सरकार समोरील महत्वाचे लक्ष असणार आहे. जेणे करून आगामी काळात देशाची लोकसंख्या अपेक्षे प्रमाणे वाढू शकेल. यामुळे रशियाचे भविष्य सुरक्षित होईल. येणारा काळ रशियाचा आहे. तसाच पूर्वीसारखा बलशाली आणि शाश्वत रशिया.
पुतीन म्हणाले, 'रशियातील काही जाती समूहांनी आजही चार, पाच अथवा त्याहून अधिक मुले जन्माला घालण्याची परंपरा जपली आहे. आपल्याला हे लक्षात असायला हवे की, पूर्वी रशियन कुटुंबात आपल्या आजी-पंणजीला सात, आठ अथवा त्याहूनही अधिक मुलं हेत होती. चला, या उत्कृष्ट परंपरांचे जतन आणि पुनरुज्जीवन करूया. मोठी कुटुंबे आदर्श व्हायरला हवीत, कारण कुटुंब हा केवळ राज्याचा आणि समाजाचा पाया नसून, ती एक आध्यात्मिक घटना आणि नैतिकतेचा स्रोत आहे.'
3 लाख जणांचा मृत्यू 9 लाख लोकांनी देश सोडला? -
पुतिन यांच्या याच्या वक्तव्याचे पाश्चिमात्य देशांतील विश्लेशकांनी विश्लेशन करायलाही सुरुवात केली आहे. खरे तर, पुतीनयांच्या वक्तव्यात युक्रेन युद्धात मारल्या गेलेल्या रशियन सैनिकांच्या आकडेवारीचा उल्लेख नाही. मात्र, अनेक तज्ज्ञांनी पुतीन यांचे हे वक्तव्य युक्रेन युद्धात मारल्या गेलेल्या सैनिकांच्या अशा आकडेवारीसोबत जोडले जात आहे, ज्यासंदर्भात आतापर्यंत मास्को प्रशासन कुठल्याही प्रकारची पुष्टी केलेली नाही.