मला पुन्हा एकदा संधी द्या; झुकेरबर्गचं भावनिक आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2018 09:44 AM2018-04-05T09:44:25+5:302018-04-05T09:44:25+5:30
केंब्रिज अॅनॅलिटिका डेटा लिक प्रकरणामुळे जगभरातून फेसबुकवर मोठी टीका होत आहे.
वॉशिंग्टन: 'मला पुन्हा एकदा संधी द्या. फेसबुक चालवण्यासाठी मी अजूनही समर्थ आहे,' अशा शब्दांमध्ये फेसबुकचा सीईओ मार्क झुकेरबर्गने त्याच्या भावना व्यक्त केल्या. केंब्रिज अॅनॅलिटिका डेटा लिक प्रकरणामुळे जगभरातून फेसबुकवर मोठी टीका होत आहे. वापरकर्त्यांची माहिती लिक केल्यामुळे फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. याबद्दल स्पष्टीकरण देण्यासाठी आणि भूमिका स्पष्ट करण्यासाठी झुकेरबर्गने पत्रकार परिषद घेतली.
'फेसबुककडून झालेल्या डेटा लिकची संपूर्ण जबाबदारी माझी आहे. ही जबाबदारी मी स्वीकारतो,' असे झुकेरबर्गने पत्रकार परिषदेत म्हटले. वापरकर्त्यांची माहिती इतक्या मोठ्या प्रमाणात लिक झाल्यानंतरही फेसबुकचे नेतृत्व करण्यासाठी तुम्ही स्वत:ला सक्षम समजता का, असा प्रश्न यावेळी पत्रकारांनी त्याला विचारला. या प्रश्नाला त्याने होकारार्थी उत्तर दिले. फेसबुकवरील ८ कोटी ७० लाख लोकांची माहिती लिक झाल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. यातील बहुतांश वापरकर्ते हे अमेरिकेतील आहेत.
मला माझी चूक सुधारण्याची संधी द्या, अशी विनंती झुकेरबर्गने पत्रकार परिषदेत बोलताना केली. 'माझी चूक खूप मोठी आहे. मी पूर्णपणे माझ्या चुकीची जबाबदारी स्वीकारतो. मात्र चुकांमधूनच माणसे शिकत असतात. फेसबुककडून झालेल्या चुकीची जबाबदारी सर्वप्रथम मीच पुढे येऊन स्वीकारली. या संपूर्ण प्रकरणात मी कमी पडलो, हे मी मान्य केले होते,' असे झुकेरबर्गने म्हटले.
या प्रकरणामुळे फेसबुकच्या संचालक पदावरुन कोणाचीही हकालपट्टी झालेली नाही, असेही झुकेरबर्गने स्पष्ट केले. 'मी फेसबुकची सुरुवात केली. इथे होणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी मीच जबाबदार आहे. त्यामुळे ज्या काही चुका झाल्या, त्याला सर्वस्वी मीच जबाबदार आहे. या चुकीबद्दल कोणालाही कंपनीतून काढण्यात आलेले नाही. मात्र आजही मी फेसबुक अतिशय समर्थपणे सांभाळू शकतो,' असे त्याने पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.