पाणी द्या हो.. 25 देशांवर येणार भीषण संकट; १९६० पासून पाण्याची मागणी दुपटीहून अधिक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2023 01:34 PM2023-08-20T13:34:40+5:302023-08-20T13:35:23+5:30
आफ्रिकी देशांमध्ये स्थिती अधिक गंभीर
लोकमत न्यूज नेटवर्क, वॉशिंग्टन: जगभरातील एक चतुर्थांश लोकसंख्या राहत असलेले तब्बल २५ देश गंभीर पाणीटंचाईचा सामना करीत आहेत. वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूटच्या एक्वाडस्ट वॉटर रिस्क ॲटलसमध्ये हे चित्र समोर आले आहे. टंचाईचा सामना करीत असलेल्या देशांमध्ये भारताचा क्रमांक २४ व्या स्थानी आहे. जगभरातील निम्म्या लोकसंख्येला म्हणजेच सुमारे ४०० कोटी लोकांना दरवर्षी किमान महिनाभरासाठी टंचाईला सामोरे जावे लागते. जागतिक स्तरावर विचार केला तर १९६० पासून पाण्याची मागणी दुपटीहून अधिक वाढली आहे.
आफ्रिकी देशांमध्ये स्थिती अधिक गंभीर
- ज्या देशांमध्ये नागरिक उपलब्ध पाण्याचा जवळपास पूर्णपणे वापर करतात तिथे पाण्याची अत्यंतिक चणचण आहे असे म्हटले जाते. या स्थितीत कमी दुष्काळ आला तरी गंभीर स्थिती उद्भवू शकते.
- मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिकेत स्थिती गंभीर आहे. या भागात ८३ टक्के लोकसंख्येला पाण्याची चणचण जाणवते आहे. दक्षिण आशियामध्ये ७४ टक्के लोकसंख्येला गंभीर पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
भारताच्या जीडीपीवर परिणाम
जगभरातील जवळपास ६० टक्के लोकसंख्येला २०५० पर्यंत वर्षभरातून एका महिनाभरासाठी पाण्याच्या गंभीर टंचाईचा सामना करावा लागणार आहे. २०५० मध्ये भारत, मेक्सिको, इजिप्त आणि तुर्कस्तान या चार देशांच्या निम्म्याहून अधिक जीडीपीचे नुकसान केवळ पाण्याच्या कमतरतेमुळे होणार आहे.
खाद्यसुरक्षेवरही संकट
पाण्याच्या टंचाईमुळे देशातील औद्योगिक उत्पादनाला मोठा फटका बसतो. वीजनिर्मितीही घटते. शेती उत्पादनांवर गंभीर परिणाम होतो. पाणीटंचाईमुळे जगासमोर खाद्यसुरक्षेचे संकट उभे राहिले आहे. जगभरातील ऊस, गहू, तांदूळ आणि मका उत्पादक पाणीटंचाईमुळे मोठ्या संकटात सापडले आहेत. २०५० पर्यंत जगाची लोकसंख्या १० अब्जावर पोहोचण्याचा अंदाज आहे. इतक्या लोकसंख्येला पुरेल इतके अन्नधान्य पिकवावे लागणार आहे. यासाठी २०१० तुलनेत अन्नधान्याचे उत्पादन जवळपास ५६ टक्क्यांनी वाढवावे लागणार आहे.