'आठवड्याच्या चहाच्या खर्चाइतके १५0 रु. द्या'; विकिपीडिया आर्थिक अडचणीत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 04:54 AM2020-02-13T04:54:27+5:302020-02-13T04:54:35+5:30
जगभरातील नेटिझन्सना विकिपीडियाचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : शाळा-महाविद्यालयांपासून नोकरदार आणि इतरही लोक अचूक माहिती हवी असेल, तर इंटरनेटवरील विकिपीडियाचा आधार घेतात. विकिपीडिया म्हणजे माहितीचा खजिनाच मानला जातो.
इतिहास, भूगोल, व्यक्ती, संस्था, विविध देश, तेथील सरकारे, कंपन्यांची कामगिरी, आर्थिक स्थिती असे माहितीचे भांडार सर्वांना मोफत मिळते. त्याचा अनेक जण आधार घेत असतात. विकिपीडिया १५ जानेवारी, २00१ पासून आपल्या जीवनाचा भाग बनला आहे. त्याच दिवशी इंग्रजीत सुरू झालेला विकिपीडिया आता अनेक भारतीय, तसेच परदेशी भाषेतही उपलब्ध आहे. मराठी विकिपीडियाचाही अनेक जण माहिती मिळविण्यासाठी आधार घेतात.
आता या विकिपीडियाला सर्व नेटिझन्सचीच मदत हवी आहे. त्यामुळे विकिपीडियाने भारतासह जगभरातील नेटिझन्सना जाहीर आवाहन केले आहे. विकिपीडियाचे पान उघडताच ते आवाहन दिसते. त्यात विकिपीडियाने आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे. आमचा विकिपीडिया हा उपक्रम सुरू ठेवण्यासाठी केवळ १५0 रुपये देणगी म्हणून द्या, असे आवाहन त्यात आहे.
अशी पाठवा रक्कम
ना नफा, ना तोटा पद्धतीने आम्ही विकिपीडियाची सुरुवात केली, तेव्हा तुम्हाला याचा पश्चात्ताप होईल, असे अनेक जण म्हणाले होते, पण ज्ञान, माहिती अचूक व विश्वासार्ह असावी आणि ती अधिकाधिक लोकांना मिळावी, यासाठी आम्ही प्रयत्न करीत राहिलो. ही वाढ होत राहावी, यासाठी तुमची मदत हवी आहे, असे आवाहनात म्हटले आहे.