सलाइनऐवजी फॉर्र्मालिन दिल्याने महिला मृत, एक-एक अवयव निकामी होत गेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 12:02 AM2018-04-15T00:02:52+5:302018-04-15T00:02:52+5:30
रसियाच्या व्होल्गा प्रांतातील उल्यानोवस्क शहरात नियमित शस्त्रक्रिया करताना इस्पितळातील कर्मचाऱ्यांनी नसेतून सलाइन देण्याऐवजी मृतदेह सडू नये, म्हणून वापरतात ते फॉर्मालिन हे अत्यंत विषारी द्रव टोचल्याने एका २८ वर्षांच्या महिलेचा अत्यंत करुण अंत झाला.
उल्यानोवस्क (रशिया) : रसियाच्या व्होल्गा प्रांतातील उल्यानोवस्क शहरात नियमित शस्त्रक्रिया करताना इस्पितळातील कर्मचाऱ्यांनी नसेतून सलाइन देण्याऐवजी मृतदेह सडू नये, म्हणून वापरतात ते फॉर्मालिन हे अत्यंत विषारी द्रव टोचल्याने एका २८ वर्षांच्या महिलेचा अत्यंत करुण अंत झाला.
‘तास’ या रशियन वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, इकातेरिना फ्येदारेवा या महिलेस बिजांड कोशात झालेल्या गाठीवर शस्त्रक्रिया करण्यासाठी इस्पितळात दाखल केले गेले होते. सलाइनऐवजी तिला फॉर्मालिन हे द्रव नसेतून देण्यात येत असल्याची चूक अवघ्या पाच मिनिटांत डॉक्टरांच्या लक्षात आली. लगेच ते बंद करण्यात आले, परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता. फॉर्मालिनमधील फॉर्मलडिहाइड हे द्रव्य एवढे विषारी असते की, मृत्यू होण्यास ते एक औंस शरीरात गेले, तरी पुरेसे होते.
नसेतून हे विष शरीरात जाऊ लागताच इकातेरिना हिने उशाशी बसलेल्या आईला ‘मॉम मी आता काही वाचत नाही,’ असे खोल गेलेल्या आवाजात सांगितले, परंतु वेदना होत असल्याने ती तसे म्हणत असावी, असे आईला वाटले. हे जहाल विष जसजसे इकातेरिनाच्या शरीरात भिनत गेले, तसे तिचे एक एक अवयव निकामी होत गेले. विष उतरविण्यासाठी डॉक्टरांनी तिला आणखी ५० औषधे टोचली. केस हाताबाहेर जात आहे हे दिसल्यावर तिला तातडीने मॉस्कोला हलविण्यात आले, पण इकातेरिना वाचू शकली नाही. (वृत्तसंस्था)
परिचारिकेची चूक
व्होल्गा प्रांताचे आरोग्यमंत्री रशिद अब्दुल्लोह यांनी या दुर्दैवी घटनेबद्दल शोक व्यक्त केला आणि मृताच्या कुटुंबीयांना सरकार सर्वतोपरी मदत करेल, असे जाहीर केले. सलाइन म्हणून लावण्यासाठी परिचारिकेने जी बाटली घेतली, त्यावरील नाव नीट न वाचल्याने हा प्राणघातक घोळ झाला, असे ते म्हणाले. संबंधित इस्पितळाच्या मुख्य डॉक्टरला तात्काळ बडतर्फ करण्यात आले असून, इतरांवर फौजदारी खटला दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.