CEO पराग अग्रवाल यांना नारळ देणे ट्विटरचे नवे मालक एलॉन मस्क यांना पडू शकते महागात, समोर येतेय अशी माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 10:26 AM2022-04-26T10:26:21+5:302022-04-26T10:44:51+5:30
Twitter News: एलॉन मस्क यांनी सोमवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरची खरेदी केली आहे. सुमारे ४४ अब्ज डॉलर एवढ्या किमतीमध्ये हा व्यवहार झाला आहे. ट्विटरची विक्री झाल्यानंतर आता कंपनीचे सीईओ पराग अग्रवाल यांना निरोप दिला जाईल, अशी चर्चा सुरू झाली आहे.
न्यूयॉर्क - एलॉन मस्क यांनी सोमवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरची खरेदी केली आहे. सुमारे ४४ अब्ज डॉलर एवढ्या किमतीमध्ये हा व्यवहार झाला आहे. त्याबरोबरच २०१३ पासून पब्लिक चालत असलेली ही कंपनी आता प्रायव्हेट झाली आहे. ट्विटरची विक्री झाल्यानंतर आता कंपनीचे सीईओ पराग अग्रवाल यांना निरोप दिला जाईल, अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र असे होईल की, नाही याबाबत अद्याप कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
मात्र येत असलेल्या वृत्तानुसार ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांना कंपनीतून बाहेरची वाट दाखवली गेल्यास त्यांना सुमारे ४.२ कोटी डॉलर (सुमारे ३२१.६ कोटी रुपये) मिळतील. रिसर्च फर्म Equilar ने दिलेल्या माहितीनुसार जर सध्याचे सीईओ पराग अग्रवाल यांना कंपनीची विक्री झाल्याच्या १२ महिन्यांच्या आत ट्विटरमधून निरोप दिला गेल्यास सुमारे ४.२ कोटी डॉलर मिळतील.
या महिन्याच्या सुरुवातीपासूनच एलॉन मस्क हे ट्विटरला खरेदी करण्याचा प्रयत्न करत होते. एप्रिलच्या सुरुवातीला त्यांनी कंपनीचे ९.२ टक्के शेअर खरेदी केले होते. आता संपूर्ण कंपनीच त्यांनी ताब्यात घेतली आहे. १४ एप्रिल रोजी सिक्युरिटी फायलिंगमध्ये मस्क यांनी त्यांना ट्विटरच्या सध्याच्या मॅनेजमेंटवर विश्वास नसल्याचे सांगितले होते. त्याशिवाय मस्क हे गेल्या काही काळापासून ट्विटरच्या धोरणावर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते. त्यामुळे कंपनीची विक्री झाल्यानंतर पराग अग्रवाल यांना निरोप दिला जाऊ शकतो.
दरम्यान, या चर्चांवर ट्विटरच्या प्रतिनिधींकडून कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया आलेली नाही. पराग अग्रवाल यांना गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात ट्विटरचे सीईओ बनवण्यात आले होते. ट्विटर प्रॉक्सीच्या माहितीनुसार २०२१ साठी त्यांचं एकूण कंपनसेशन हे ३.०४ कोटी डॉलर एवढे होते. ज्यामध्ये बहुतांश स्टॉक त्यांना भेट म्हणून मिळाले होते.