अंटार्क्टिका समुद्रात हिमनगाला मोठा तडा, पाणी पातळी 25 इंचानी वाढणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 10:51 AM2021-12-15T10:51:25+5:302021-12-15T11:07:07+5:30
अंटार्क्टिका समुद्रात हा हिमनग वितळल्यास जगभरातील समुद्रातील पाण्याची पातळी 25 इंचांनी वाढणार आहे, अशा स्थितीत मुंबईसह जगाच्या किनारपट्टीवरील शहरांचे अनेक भाग पाण्याखाली जाऊ शकतात
वॉशिंग्टन - जमिनीवरील महाकाय पाण्याचा स्त्रोत असलेल्या अंटार्टिका समुद्रातील हिमनगाला तडा गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अंटार्क्टिकाच्या डूम्सडे ग्लेशियरवर (Antarctic’s doomsday glacier) मोठा धोका निर्माण झाला आहे. थ्वेट्स ग्लेशियरमध्ये (Thwaites Glacier) एक लांबलचक तडा गेल्याचे दिसून आले आहे. हा ग्लेशियर 170,312 किमी लांब आहे, जो अमेरिकेतील फ्लोरिडा राज्याच्या विस्तीर्णाएवढा आहे. येत्या 5 वर्षांत हा हिमनग तुटणार असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
अंटार्क्टिका समुद्रात हा हिमनग वितळल्यास जगभरातील समुद्रातील पाण्याची पातळी 25 इंचांनी वाढणार आहे, अशा स्थितीत मुंबईसह जगाच्या किनारपट्टीवरील शहरांचे अनेक भाग पाण्याखाली जाऊ शकतात. या थ्वेट्स ग्लेशियरवर पडलेल्या भेगा गतीमान असून जागतिक पातळीवरील समुद्राच्या वाढीव पाण्याच्या 4 पट हे पाणी असेल, असा धोक्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. समुद्रातील गरम होत असलेलं पाणी थ्वेट्स ग्लेशियरच्या घनतेला तडा देत असल्याचे सोमवारी जारी करण्यात आलेल्या आकड्यांवरुन दिसून येते. अमेरिकन जिओफिजिकल यूनियनच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत यासंदर्भातील आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.
जागतीक पातळीवर 25 टक्क्यांची जलस्तर वाढ
हिमनगाला तडा गेल्याने अनेक मोठ्या आणि तिरक्या भेगा पडल्या आहेत. जर पाण्यात तरंगणाऱ्या बर्फाचा हिमनग कोसळला, तर थ्वेट्स ग्लेशियरमुळे जागतिक पातळीवर समुद्र पाण्याच्या पातळीत 25 टक्क्यांची वाढ होईल, असे संशोधनकर्त्यांनी म्हटले आहे. प्राध्यापक स्टेड काबोस यांनी म्हटले की, ग्लेशियरच्या प्रभावाचा 1 दशकांपेक्षाही अधिकचा बदल होईल. त्यामुळे, अनेक नवसंशोधन यातून समोर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, एका संशोधनानुसार 1980 च्या दशकापासून आत्तापर्यंत कमीत कमी 600 अब्ज टन बर्फ नष्ट झाला आहे.