'मोदी 3.0', Exit Poll वर पाकिस्तान, रशिया, चीन, सौदीसह जगभरातील मीडियाने काय म्हटले?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2024 03:57 PM2024-06-03T15:57:36+5:302024-06-03T15:58:01+5:30

Global Media on Indian Lok Sabha Election : एक्झिट पोलच्या निकालात BJP ला प्रचंड बहुमत मिळताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ शकतात, त्यामुळे ब्रिटन, रशिया, चीन, तुर्कस्तान, सौदीसह जगभरातील प्रमुख वृत्तपत्रांमध्ये याबाबत बरीच चर्चा सुरू आहे.

Global Media on Indian Lok Sabha Election : what did the media of the world including Pakistan, Russia, China, Saudi say on the exit poll? | 'मोदी 3.0', Exit Poll वर पाकिस्तान, रशिया, चीन, सौदीसह जगभरातील मीडियाने काय म्हटले?

'मोदी 3.0', Exit Poll वर पाकिस्तान, रशिया, चीन, सौदीसह जगभरातील मीडियाने काय म्हटले?

Global Media on Indian Lok Sabha Election : भारतातील लोकसभा निवडणुकीसाठी मतदान संपल्यानंतर लगेच शनिवारी एक्झिट पोल जाहीर झाले. यामध्ये भापजच्या नेतृत्वातील NDA ला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहेत. एक्झिट पोलमध्ये एनडीएला 361 ते 401 जागा मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, जगातभरातील अनेक माध्यमे या निवडणुका कव्हर करत आहेत. तसेच, त्यांनी या एक्झिट पोलच्या निकालांवरही आपली प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये रशिया, ब्रिटन, चीन, पाकिस्तान, बांगलादेश, यूएईसह अनेक देशांच्या मीडियाचा समावेश आहे.

ब्रिटिश मीडियाने काय म्हटले?
ब्रिटनचे मोठे वृत्तपत्र 'द गार्डियन'ने सोमवारी(3 जून) जारी केलेल्या वृत्तात म्हटले की, भारतात सध्या सुरू असलेल्या निवडणुकांचे मतदान संपले असून, एक्झिट पोलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी ऐतिहासिक तिसऱ्यांदा विजयी होतील, असे भाकीत केले जात आहे. भाजप संसदेत बहुमतासाठी आवश्यक असलेल्या दोन तृतीयांश जागांच्या पुढे जात असल्याचे दिसत आहे. भारताच्या धर्मनिरपेक्ष लोकशाहीत लक्षणीय परिवर्तन करणारे हिंदू राष्ट्रवादी नेते, नरेंद्र मोदी यांचा हा ऐतिहासिक विजय असेल. जवाहरलाल नेहरुंनंतर एकाही पंतप्रधानाला सलग तिसऱ्यांदा निवडणूक जिंकता आलेली नाही.

चीन
चीनचे अधिकृत वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने लिहिले की, एक्झिट पोलच्या निकालावरुन पंतप्रधान मोदी सलग तिसऱ्यांदा विजयी होणार असल्याचे दिसत आहे. तज्ज्ञांचा हवाला देत चिनी वृत्तपत्राने लिहिले की, विजयानंतर मोदी आपल्या देशांतर्गत राजकारण आणि परराष्ट्र धोरणात कोणतेही बदल करणार नाहीत आणि भारताच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरूच ठेवतील. निवडणूक जिंकल्यानंतर मोदींचे लक्ष अमेरिका आणि चीननंतर भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनविण्यावर असेल. मुत्सद्दी मार्गाने जगात भारताचा प्रभाव वाढवण्याचाही मोदी प्रयत्न करतील.

रशिया
रशियाचे सरकारी रशिया टीव्ही (आरटी) ने देखील एक्झिट पोलच्या निकालाचा अहवाल प्रकाशित केला आहे. RT ने लिहिले की, विविध एक्झिट पोलच्या निकालांवरून असे दिसून आले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पक्ष भारताच्या राष्ट्रीय निवडणुकांमध्ये प्रचंड बहुमताने सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार आहे. मोदींचा विजय ऐतिहासिक ठरणार आहे, कारण भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर कोणताही पंतप्रधान सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेला नाही. 

पाकिस्तान
पाकिस्तानच्या डॉन वृत्तपत्राने लिहिले की, जर आपण दोन एक्झिट पोलचा सारांश घेतला तर भारतातील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीलोकसभेच्या 543 पैकी 350 जागा जिंकत असल्याचे दिसते. अनेकदा भारतातील एक्झिट पोल चुकीचेही सिद्ध झाले आहेत. भारतासारख्या मोठ्या आणि वैविध्यपूर्ण देशात एक्झिट पोलद्वारे निवडणुकीच्या निकालांचा अंदाज बांधणे मोठे आव्हान असल्याचेही या रिपोर्टमध्ये म्हटले.

बांग्लादेश
बांग्लादेशातील आघाडीच्या 'द डेली स्टार'ने एक्झिट पोलवर आधारित आपल्या बातमीचे शीर्षक दिले आहे - 'भारताच्या विरोधकांनी एक्झिट पोलचे अंदाज नाकारले.' डेली स्टारच्या वृत्तात म्हटले की, 'पंतप्रधान मोदी पुन्हा सत्तेत येत असल्याचा दावा करणाऱ्या एक्झिट पोलच्या अंदाजांना विरोधी नेत्यांनी चुकीचे ठरवले आहे. राहुल गांधी म्हणाले की, हा एक्झिट पोल नसून हा मोदींचा मीडिया पोल आहे. 

तुर्किये
तुर्कस्तानच्या सरकारी टीआरटी वर्ल्डने एका वृत्तात लिहिले की, विविध मीडिया हाऊसेसने घेतलेल्या एक्झिट पोलनुसार भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीला लोकसभेत दोन तृतीयांश बहुमत मिळू शकते. तज्ञ आणि विश्लेषकांनी निवडणुकीत मोदींच्या विजयाचा अंदाज आधीच वर्तवला होता. मोदींना भारतात खूप पाठिंबा आहे, पण त्यांच्या कार्यकाळात लोकशाही मूल्ये आणि अल्पसंख्याकांच्या हक्कांबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. भाजपला भक्कम बहुमत मिळाल्यास ते घटनादुरुस्तीही करू शकतात, अशी भीती विरोधकांना वाटत आहे. घटनादुरुस्ती करण्यासाठी दोन तृतीयांश बहुमत आवश्यक आहे आणि एक्झिट पोलनुसार, जर भाजपने 365 जागा जिंकल्या तर ते ते सहज करू शकतात.

कतार
कतारच्या अल्जजीराने रविवारी प्रकाशित केलेल्या एका वृत्तात लिहिले की, एक्झिट पोलनुसार पीएम मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान होताना दिसत आहेत. भाजपची सत्ता आल्यावर ते वाढती असमानता, बेरोजगारी आणि महागाई, या मुद्द्यांपासून सुटू शकणार नाही. 

सौदी अरब
सौदी अरेबियातील वृत्तपत्र अरब न्यूजने लिहिले की, एक्झिट पोलनुसार 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळत आहे, त्यामुळे पंतप्रधान मोदी सलग तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होणार आहेत.

यूएई
संयुक्त अरब अमिरातीमधील वृत्तपत्र खलीज टाईम्सने एक्झिट पोलचा हवाला देत लिहिले की, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्ष सार्वत्रिक निवडणुकीत बहुमत मिळवणार आहे. एक्झिट पोलने दाखवून दिले की, 543 जागांच्या लोकसभेत सत्ताधारी एनडीए 350 जागा जिंकू शकते. 

Web Title: Global Media on Indian Lok Sabha Election : what did the media of the world including Pakistan, Russia, China, Saudi say on the exit poll?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.