दहशतवादाविरुद्ध जागतिक रणनीती हवी
By admin | Published: November 23, 2015 12:01 AM2015-11-23T00:01:51+5:302015-11-23T00:01:51+5:30
कोणत्याही देशाने दहशतवादाचा वापर वा समर्थन करू नये, असे सांगतानाच दहशतवादाविरुद्धच्या लढाईत राजकीय तडजोडीचा विचार होऊ नये, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.
क्वालालंपूर : कोणत्याही देशाने दहशतवादाचा वापर वा समर्थन करू नये, असे सांगतानाच दहशतवादाविरुद्धच्या लढाईत राजकीय तडजोडीचा विचार होऊ नये, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.
दहाव्या पूर्व आशियाई शिखर संमेलनात ते बोलत होते. मोदी म्हणाले की, दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी आता जागतिक स्तरावर रणनीती आखण्याची गरज आहे. दहशतवादाला धर्मापासून वेगळे करणे आणि मानवी मूल्यांच्या प्रसाराच्या प्रयत्नांचे स्वागत व्हायला हवे.
दक्षिण चीन सागरातील वादाबाबत बोलताना मोदी म्हणाले की, समुद्र आमच्या सुरक्षेचा मार्ग बनायला हवा. संयुक्त राष्ट्र संघाच्या सर्व आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन करायला हवे. यावर शांततेने मार्ग काढायला हवा. भारताला आशा आहे की, दक्षिण चीन सागरातील वादाबाबत सर्वच संबंधित नियमांचे पालन करतील.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, आपण नेहमीच एका क्षेत्रापुरताच दहशतवादाचा विचार करीत असतो; पण पॅरिस, आंकारा, बैरुत, मालीमधील हल्ला आणि रशियाच्या विमानाला केलेले लक्ष्य या घटना पाहिल्या तर लक्षात येते की, दहशतवादाने पूर्ण जगालाच घेरले आहे. जगभरातून होणारी अतिरेकी कारवायांसाठीची भरती आणि त्यांच्याद्वारे होणारे हल्ले याच दहशतवादाचे पुरावे आहेत.
विवेकानंद आमचा आत्मा : मोदी
क्वालालंपूर : स्वामी विवेकानंद आमचा आत्मा आहे. ज्यांनी जनसेवा हीच प्रभूसेवा असल्याचे सांगितले होते. शंभर वर्षांपूर्वी वन आशियाची कल्पना विवेकानंदांनी मांडली होती, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.
स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे अनावरण केल्यानंतर एका कार्यक्रमात बोलताना मोदी म्हणाले की, आशियातील समस्यांचे उत्तर विवेकानंद यांच्या संदेशांमध्ये आहे.
दहशतवादावरील समस्येचे समाधानही बुद्ध आणि विवेकानंद यांच्या विचारात आहे. आज ग्लोबल वॉर्मिंगवर चर्चा होत आहे; पण आम्ही त्या देशाशी नाते सांगतो जेथे झाडाच्या रोपट्यातही ईश्वराला बघितले जाते. आम्ही नेहमीच निसर्गाच्या सोबत राहिलेलो आहोत.
संयुक्त राष्ट्र संघाकडून २१ जून योग दिवस घोषित केल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना ते म्हणाले की, आज जगभरात योगाविषयी आकर्षण वाढत आहे. लोक तणावमुक्त जीवनासाठी उत्सुक आहेत. त्यावर योगाच्या माध्यमातून उपाय दिसून येतो. आज जगभरात योग शिक्षक उपलब्ध करण्याचे आवाहनही आहे.
इसिसविरुद्धच्या लढाईत मुळीच ढिलाई नाही -ओबामा
क्वालालंपूर : सिरियात जोपर्यंत असद यांची सत्ता आहे तोपर्यंत तेथील हिंसाचार थांबणार नाही, असे सांगतानाच इसिसविरुद्ध अमेरिका व मित्रराष्ट्रे जराही ढिलाई करणार नाहीत, असे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी स्पष्ट केले.
तुर्की आणि आशियातील आपल्या दौऱ्याचा समारोप करताना ते बोलत होते. ओबामा म्हणाले की, आमचे सर्वात शक्तिशाली हत्यार हे आहे की, आम्ही भयभीत झालो नाहीत.रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आमच्या रणनीतीसोबत यावे. त्यांनी असद यांना समर्थन देणे बंद करावे. इसिस हा रशियाचे विमान पाडणारा आरोपी आहे, असा उल्लेखही त्यांनी केला. वॉशिंग्टनला रवाना होण्यापूर्वी ते बोलत होते. त्यांनी फिलिपिन आणि तुर्कीलाही भेट दिली.
‘आसियान’ राष्ट्रांकडून ‘आसियान आर्थिक गट’ स्थापन
क्वालालंपूर : युरोपियन युनियनच्या (ईयू) धर्तीवर अग्नेय आशियातील १० देशांनी ‘आसियान आर्थिक समुदाय’ स्थापन केल्याची घोषणा रविवारी येथे केली.‘आसियान राष्ट्रा’च्या शिखर परिषदेत जाहीर करण्यात आलेल्या घोषणापत्रात अशा समुदायाच्या घोषणेचा उल्लेख आहे. भारत हा या संघटनेचा सदस्य नाही; पण निरीक्षक म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी उपस्थित होते. याशिवाय संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस बान की मून यांचीही यावेळी विशेष उपस्थिती होती.
एकत्रित संयुक्त बाजारपेठ स्थापन करण्याचा यामागचा उद्देश असून, सर्व देशांच्या एकत्रित सकल राष्ट्रीय उत्पादनाचा विचार करता २.५७ खर्व डॉलरहून अधिक भांडवल येथे उपलब्ध होईल. त्यात माल, भांडवल आणि प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची मुक्त देवाण-घेवाण होईल. याचा अतिशय मोठा परिणाम या भागातील ६२० दशलक्ष लोकांवर होणार आहे. या १० देशांनी ‘आसियान २०२५, सर्वांची एकत्रित आगेकूच’ हे घोषणापत्र मंजूर केले.