रियाधहून दिल्लीकडे येत असलेल्या गो-एअरच्या विमानाचं पाकिस्तानात एमर्जन्सी लँडिंग
By कुणाल गवाणकर | Published: November 17, 2020 11:04 PM2020-11-17T23:04:58+5:302020-11-17T23:05:24+5:30
दिल्लीकडे येत असलेलं विमान अचानक कराची विमानतळावर उतरलं
नवी दिल्ली: रियाधहून दिल्लीला येत असलेल्या गो-एअरच्या विमानानं पाकिस्तानात एमर्जन्सी लँडिंग केलं आहे. वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यानं गो-एअरचं विमान कराचीतल्या विमानतळावर उतरलं. एका प्रवाशाची प्रकृती बिघडल्यानं वैमानिकानं कराचीत विमान उतरवण्याचा निर्णय घेतला. मात्र त्या प्रवाशाला वाचवण्यात अपयश आलं. यानंतर विमानानं दिल्लीच्या दिशेनं उड्डाण केलं.
गो-एअरचं विमान (G8- 6658A) रियाधहून दिल्लीकडे येत असताना एका प्रवाशाची हृदयक्रिया बंद पडली. त्यानंतर वैमानिकानं तातडीनं पाकिस्तानी हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. नियंत्रण कक्षानं मानवतेच्या आधारे लँडिंगला परवानगी दिली. त्यानंतर विमान कराची विमानतळावर उतरलं. मात्र विमानतळावरील डॉक्टरांनी प्रवाशाला मृत घोषित केलं. मृत व्यक्तीचं वय ३० वर्षे असून ती उत्तर प्रदेशातल्या बरेलीची रहिवासी असल्याचं कळतं.
GoAir Riyadh-Delhi flight diverted to Karachi airport due to a medical emergency onboard (passenger reported unwell). The flight landed safely at Karachi airport: Airline Official
— ANI (@ANI) November 17, 2020
More details awaited. pic.twitter.com/0MV47qzRM6
याच महिन्यात रियाधहून बंगळुरूला येत असलेल्या इथोपियन एअरलाईन्सचं विमानानं मुंबई विमानतळावर एमर्जन्सी लँडिंग केलं होतं. हायड्रोलिक गळतीमुळे विमान मुंबईत उतरलं. सुदैवानं यामुळे कोणतंही नुकसान झालं नाही. विमानातून झालेल्या हायड्रोलिक गळतीमुळे इथोपियन एअरलाईन्सच्या विमानानं (ET690) मुंबईत लँडिंग केल्याची माहिती मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवक्त्यांनी दिली.