जगात कुठ्ठेही जा, ‘तो’ तुमच्या मागेच येईल!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 11:24 AM2022-11-18T11:24:08+5:302022-11-18T11:26:14+5:30

तुम्हाला गणित हा विषय आवडतो? - आता या प्रश्नावर नक्कीच दोन प्रकारची मतं येतील. काही जण म्हणतील, नक्कोच गणित हा विषय. कशाला हवी ती डोकेउठाड? याच विषयामुळे आमच्यावर नापास व्हायची वेळ येते, आमचं वर्ष वाया जातं.

Go anywhere in the world, 'he' will follow you! | जगात कुठ्ठेही जा, ‘तो’ तुमच्या मागेच येईल!

जगात कुठ्ठेही जा, ‘तो’ तुमच्या मागेच येईल!

googlenewsNext

तुम्हाला गणित हा विषय आवडतो? - आता या प्रश्नावर नक्कीच दोन प्रकारची मतं येतील. काही जण म्हणतील, नक्कोच गणित हा विषय. कशाला हवी ती डोकेउठाड? याच विषयामुळे आमच्यावर नापास व्हायची वेळ येते, आमचं वर्ष वाया जातं. शालेय शिक्षणात गणित हा विषय कम्पल्सरी आहे, म्हणून तो शिकावा लागतो. एकदा का दहावी पास झालो ना, की मग त्या गणिताचं तोंडदेखील पाहणार नाही. मग बघा, माझ्या आयुष्यात कसा भराभ्भर प्रगती करतो ते! ज्यांचं गणितावर विशेष प्रेम आहे, ते म्हणतील, गणितासारखा दुसरा सोप्पा विषय नाही. गणिताची शिडीच तुम्हाला झटपट उंचीवर नेऊन पोहोचवते. शिवाय पैकीच्या पैकी मार्क्स मिळवून देणारा गणित हा एकमेव विषय आहे. गणित बरोबर सोडवलं असेल, तर जगातला कोणताही शिक्षक तुमचा अर्धा मार्कही कापू शकत नाही! 

अशी दोन्ही प्रकारची जुगलबंदी नेहेमीच चालू असते. पण, अनेकांना वाटतं, शालेय शिक्षण सोडलं तर पुढच्या आयुष्यात आपल्याला गणिताचा काडीचाही उपयोग होत नाही. मग, कशासाठी शिकायचं ते ‘किचकट’ गणित? - जगभरातल्या तज्ज्ञांचं मात्र याच्या बरोब्बर उलट मत आहे. 
तज्ज्ञ सांगतात, जगातलं असं एकही क्षेत्र नाही, जिथे गणिताचा उपयोग होत नाही! शालेय अभ्यासक्रमानंतर तुम्ही गणित सोडलं तरी गणित तुमचा पिच्छा सोडत नाही. त्यामुळे गणिताशी फटकून राहण्यापेक्षा त्याच्याशी दोस्ती केलेली केव्हाही चांगली. 

तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण कोणकोणत्या क्षेत्रात गणिताचा उपयोग होतो तुम्हाला माहीत आहे? - वाणगीदाखल ही उदाहरणं पाहा.. तुम्हाला नामांकित शेफ व्हायचंय, तुम्हाला शेतकरी व्हायचंय, तुम्हाला सुतार किंवा मेकॅनिक व्हायचंय, तुम्हाला शिक्षक, भाषातज्ज्ञ, दुकानदार, डॉक्टर, इंजिनीअर, संशोधक अगदी संगीतकार किंवा जादूगार व्हायचं असेल, तरीही त्यासाठी तुम्हाला गणित आवश्यक असतं. जाणतेपणी वा अजाणतेपणी गणिताचा वापर प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला करावाच लागतो. जगात कुठ्ठेही जा, काहीही करा, गणित हा विषय तुमचं शेपूट सोडणार नाही. तो तुमच्या मागे-मागेच येईल!
माणसांचं जाऊ द्या, अगदी किडे, प्राणी, पक्षी.. यांनाही आपल्या दैनंदित जीवनात गणिताचा वापर करावाच लागतो. तो जर केला नाही, तर हरघडी अक्षरश: प्रत्येकाचं घोडं अडेल. पक्षी हजारो किलोमीटरचा प्रवास कसा करतात? आपला मार्ग ते कसा शोधतात? गोगलगायी त्यांचं कवच कसं बनवतात? कोळी त्यांचं जाळं कसं विणतात? मधमाश्या आपलं पोळं कसं बांधतात?.. - या प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना गणिताचा वापर करावा लागतो. 
गणिताकडे खेळ, कोडं म्हणून पाहिलं, गणित आणि गेम्स यांचा संबंध मुलांना विणून दिला, तर त्यांना त्याची खूप मजा येते. गणित हा मग त्यांच्या आवडीचा विषय बनतो. आणि एकदा का गणिताची गोडी लागली, की मग ती सुटणं जरा अवघडच. गणितामुळे तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता येते, मेंदू अधिक तल्लख होण्यास मदत होते, स्मरणशक्ती वाढते, प्रत्येक क्षेत्रातील तुमचा वेग आणि अचूकता वाढते, एवढंच काय, गणित तुम्हाला तुमचा पैसाही वाढवून देतं.. असे गणिताचे अनेक उपयोग आहेत.

गणित शिकल्यानं तुम्हाला काय फायदा झाला, काय फायदा होतो, यासंदर्भात अमेरिकेतील काही गणिततज्ज्ञ आणि अभ्यासकांनी नुकतंच एक व्यापक सर्वेक्षण केलं. त्यातल्या सहभागी सर्वच मुलांनी गणिताचं महत्त्व मान्य केलं. गणित हा विषय ज्यांच्या आवडीचा नव्हता, त्यांनीही गणिताचं असामान्यत्व मान्य केलं. या मुलांचं म्हणणं होतं, आम्ही मुलं गणिताचा बऱ्याचदा कंटाळा करतो, पण संगीत, कला, खेळ.. जीवनाचं कोणतंही क्षेत्र असो, प्रत्येक ठिकाणी गणित आहे.

मिआमी कंट्री डे स्कूलमध्ये संगीताचं शिक्षण घेणारा रेनान सांगतो, संगीतातही गणित इतकं एकरूप झालेलं आहे की तुम्ही ते वेगळं करूच शकत नाही. संगीतात ऑडिओ इंजिनीअरिंग, ऑडिओ सिग्नल्स, गिटारमधील ट्युनिंग सिस्टीम समजून घेण्यासाठीही गणिताची गरज पडते. त्यामुळे आपले विचार सुस्पष्ट होत जातात.

‘..तर चेहऱ्याचाही होतो बट्ट्याबोळ’! 
व्हॅक्युव्हर येथील युनियन हायस्कूलचे विद्यार्थी म्हणतात, प्रत्येक क्षेत्रात गणिताचं कसं योगदान आहे, हे आमच्या शिक्षकांनी आम्हाला समजावून सांगितलं आणि आमची दृष्टीच बदलून गेली. स्केटबोर्ड, बास्केटबॉल, घरात आपण खेळतो तो रुबिक्स क्यूब, स्केचिंग.. या सगळ्यातलं गणित आम्ही आता स्वत:च शोधून काढतो. चित्र काढताना एखादा चेहरा व्यवस्थित काढायचा असेल, तर त्याचं गणितीय प्रमाण समजलं नाही, तर त्या चेहऱ्याचा कसा बट्ट्याबोळ होतो, हेही आम्हाला आता समजलं आहे! तुम्हीही हे गणित समजून घ्या आणि मज्जा करा!

Web Title: Go anywhere in the world, 'he' will follow you!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.