जाताजाता डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनवर डिजिटल स्ट्राईक
By जयदीप दाभोळकर | Published: January 6, 2021 01:18 PM2021-01-06T13:18:47+5:302021-01-06T13:21:27+5:30
सरकारचा हा कार्यकारी आदेश ४५ दिवसांच्या आत लागू होणार
काही महिन्यांपूर्वी भारतानं सुरक्षेच्या कारणास्तव चीनच्या काही अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी चीनचे अली पे, व्ही-चॅट आणि काही अन्य अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या अॅप्सद्वारे चिनी सरकारला काही महत्त्वपूर्ण माहिती पोहोचवली जायची असा दावा ट्रम्प प्रशासनाकडून करण्यात आला आहे. सरकारचा हा कार्यकारी आदेश ४५ दिवसांच्या आत लागू होणार आहे. येत्या काही दिवसांमध्ये अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे आपला पदभार स्वीकारणार आहेत. त्यांच्या कार्यकाळामध्येच हा निर्णय लागू होण्याची शक्यता आहे. या निर्णयाबाबत जो बायडेन यांच्याशी कोणतीही चर्चा करण्यात आली नसल्याची माहिती एका अधिकाऱ्यानं दिली.
यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी चिनी कंपनी बाईट डान्सच्या मालकीच्या असलेल्या टिकटॉक या अॅपवर अमेरिकेनं बंदी घातली होती. अलीपे, व्ही चॅट पे यांच्यासह काही चिनी अॅप्स मोठ्या प्रमाणात डाऊनलोड करण्यात येत होते असं ट्रम्प प्रशासनानं सांगितलं. तसंच लाखो लोकांचा डेटा लीक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. याकडे पाहता अनेक अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चीनच्या डेटा चोरण्याच्या रणनितीवर वार करणं हा यामागील उद्देश असल्याचं ट्रम्प प्रशासनानं स्पष्ट केलं आहे.
या अॅप्सवर बंदी
ज्या अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय ट्रम्प प्रशासनानं घेतला आहे त्यामध्ये अलीपे (Alipay), कॅमस्कॅनर (CamScanner), क्यू क्यू वॉलेट (QQ Wallet), शेअर इट (SHAREit), टेंन्सेंट क्यू क्यू (Tencent QQ), वी-मेट (VMate), वी चॅट पे (WeChat Pay) आणि डब्ल्यूपीएस ऑफिस (WPS Office) या अॅप्सचा समावेश आहे.