'कोरोना विरोधी लस टोचून घ्यायची नसेल तर भारतात जा'; फिलीपिन्स पंतप्रधानांच्या विधानानं खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 02:55 PM2021-06-24T14:55:37+5:302021-06-24T14:56:29+5:30
फिलीपिन्सच्या नागरिकांना संबोधित करताना देशाचे पंतप्रधान रॉड्रिगो दुतेर्ते यांनी खळबळजनक विधान केलं आहे.
फिलीपिन्सच्या नागरिकांना संबोधित करताना देशाचे पंतप्रधान रॉड्रिगो दुतेर्ते यांनी खळबळजनक विधान केलं आहे. नागरिकांना लसीकरणाचं महत्व पटवून देण्यासाठी रॉड्रिगो यांनी फिलीपिन्स नागरिकांशी संवाद साधला. यावेळी कोरोना विरोधी लस घेण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या नागरिकांना रॉड्रिगो यांनी फटकारलं. पण त्यांच्या एका विधानानं सोशल मीडियात धुमाकूळ उडाला आहे.
"लस घ्यायला टाळाटाळ करणाऱ्यांना अटक करा आणि जबरदस्तीनं लस टोचा. ज्यांना लस घ्यायची नसेल त्यांनी देश सोडावा आणि भारतात जावं किंवा इतर कुठंही अमेरिकेत वगैरे जावं", असं फिलीपिन्सचे पंतप्रधान रॉड्रिरो दुतेर्ते म्हणाले.
फिलीपिन्समध्ये काल एका दिवसात ४,३५३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर गेल्या १४ दिवसांत देशात ८६ हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यात नागरिक लसीकरणासाठी टाळाटाळ करत असल्यानं फिलीपिन्सचे पंतप्रधान नागरिकांवर चांगलेच संतापले. फिलीपिन्सची लोकसंख्या अवघी १० कोटी इतकी आहे.
"मला चुकीचं समजू नका. देश सध्या मोठ्या संकटाला सामोरं जातोय. राष्ट्रीय आणीबाणीची परिस्थिती निर्माण होऊ शकते. जर तुम्हाला लस घ्यायची नसेल तर अशा नागरिकांना अटक करण्याचे आदेश मी देतो. अटक करुन त्यांच्या पार्श्वभागावर लस टोचण्यात येईल. आपण आधीच संकटाचा सामना करत आहोत. तुम्ही लस न घेऊन आणखी भर टाकू नका", असा संताप पंतप्रधान रॉड्रिरो म्हणाले. यासोबतच मला कठोर निर्णय घ्यायला भाग पाडू नका असंही रॉड्रिरो यांनी ठणकावून सांगितलं आहे.
"देशात काही मुर्ख लोक आहेत की ज्यांना कोरोना विरोधी लस घ्यायची नाहीय आणि हेच लोक कोरोनाचे प्रसारक ठरताहेत. ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करणार आणि देशात कोरोना वाढवणार. तुम्हाला जर लस घ्यायची नाही. तर मी तुम्हाला पकडून लस देईन. ज्यांना लस घेण्याची इच्छा नाही त्यांनी भारतात जावं. नाहीतर इतर कोणत्याही ठिकाणी निघून जावं", असं रॉड्रिरो म्हणाले.
फिलीपिन्स पंतप्रधानांच्या या विधानानं सोशल मीडियात जोरदार प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. ट्विटरवर भारतीय नागरिक रॉड्रिरो यांच्या विधानाचा जोरदार निषेध व्यक्त करताना दिसत आहेत. तर अनेकांनी रॉड्रिरो यांनी माफी मागावी आणि नाही मागितली तरी भारत सरकारनं त्यांच्या विधानाची दखल घेऊन फिलीपिन्सशी संबंध संपुष्टात आणावेत असंही नेटिझन्स व्यक्त होत आहेत.