काय सांगता! 'या' देशात मिळतो चक्क सोन्याचा बर्गर; किंमत ऐकून व्हाल थक्क
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2020 05:32 PM2020-12-29T17:32:53+5:302020-12-29T17:39:06+5:30
अमेरिकेतील एका रेस्टॉरंटमध्ये सोन्याचा बर्गर उपलब्ध करून देण्यात आला आहे. खाद्यप्रेमींसाठी सोन्याचा बर्गर म्हणजे अगदी पर्वणीच म्हणावी लागेल.
बोगोटा : जागतिक पातळीवर अनेक प्रकारचे फास्ट फूडचे पदार्थ मिळतात. यातील अनेक पदार्थ जगभरात प्रसिद्ध आहेत. यात वरचा क्रमांक लागतो तो बर्गरचा. अमेरिकेपासून ते भारतापर्यंत अनेक देशांमध्ये बर्गर मिळतो. भारतात तर दहा-वीस रुपयांपासून ते पाच-सातशे रुपयांपर्यंत बर्गरच्या किमती असल्याचे पाहायला मिळते. मात्र, जागतिक पातळीवरील एका देशात चक्क सोन्याचा बर्गर मिळतो, असे सांगितल्यास चटकन तुमचा विश्वास बसणार नाही. मात्र, हे खरे आहे.
खाद्यप्रेमींसाठी सोन्याचा बर्गर म्हणजे अगदी पर्वणीच म्हणावी लागेल. अमेरिकेतील एका रेस्टॉरंटमध्ये सोन्याचा बर्गर उपलब्ध करून देण्यात आला आहे. अमेरिकन चलनाप्रमाणे याची किंमत ५९ अमेरिकी डॉलर म्हणजेच भारतीय चलनानुसार तब्बल ४ हजार ३०० रुपयांच्या घरात आहे. या बर्गरची खासियत म्हणजे यावर सोन्याचा वल्ख लावण्यात आला असून, याचे नाव '२४ कॅरेट बर्गर' असे ठेवण्यात आले आहे.
अमेरिकेतील कोलंबियामध्ये असलेल्या बोगोटा येथील एका रेस्टॉरंटमध्ये सोन्याचा बर्गर खाद्यप्रेमींसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार, कोलंबियातील बोगोटा येथे एका रेस्टॉरंटमध्ये खाद्यप्रेमींसाठी उत्तमोत्तम पदार्थ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सोन्याचा वल्ख लावलेला बर्गर विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे. २४ कॅरेट बर्गर तयार करताना अतिशय सावधगिरी बाळगावी लागते. सोन्याचा वल्ख लावताना काळजी न घेतल्यास नुकसान होऊ शकते, असे हा बर्गर तयार करणाऱ्या शेफ मारिया पाऊला यांनी सांगितले.
कोरोनामुळे अवघ्या जगभरातील रेस्टॉरंटंना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. अनेक रेस्टॉरंटमध्ये कामगार कपातही करण्यात येत आहे. काही रेस्टॉरंट कायमस्वरुपी बंद करण्यात आली आहेत, तर अनेकविध रेस्टॉरंटमध्ये केवळ होम डिलेव्हरी देण्यात येत आहे. कोरोना संकटातून जगभरातील देश हळूहळू सावरत असताना, रेस्टॉरंटही खाद्यप्रेमींसाठी खुली करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी रेस्टॉरंट व्यवस्थापनाकडून नवनवीन क्लृप्त्या काढल्या जात आहेत. यातील एक भाग म्हणून सोन्याचा वल्ख लावलेला बर्गर असल्याचे सांगितले जात आहे.