‘गोल्डन ओल्डी’ आजींना जगायचंय १३० वर्षे!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2024 11:20 AM2024-04-03T11:20:47+5:302024-04-03T11:20:57+5:30
International News: जगात सध्या सर्वाधिक वृद्ध कोण? यासंदर्भात बऱ्याचदा वेगवेगळे दावे केले जातात. गिनिज बुकमध्येही यासंदर्भात वेळोवेळी माहिती येते. ‘अधिकृत’ आकडेवारीनुसार आणि गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या मते अमेरिकेच्या ब्रायन्स मोरेरा आजी या सध्या जगातल्या सर्वाधिक वृद्ध महिला आहेत.
जगात सध्या सर्वाधिक वृद्ध कोण? यासंदर्भात बऱ्याचदा वेगवेगळे दावे केले जातात. गिनिज बुकमध्येही यासंदर्भात वेळोवेळी माहिती येते. ‘अधिकृत’ आकडेवारीनुसार आणि गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या मते अमेरिकेच्या ब्रायन्स मोरेरा आजी या सध्या जगातल्या सर्वाधिक वृद्ध महिला आहेत. या आजींचं वय आहे ११७ वर्षे. त्या अमेरिकेच्या असल्या तरी सध्या त्या स्पेनमध्ये राहतात आणि वयोमान व आजारपणामुळे त्यांना बऱ्याच काळापासून एका नर्सिंग होममध्येच ॲडमिट करण्यात आलं आहे.
मात्र आता ब्राझीलच्या डेओलिरा ग्लिसेरिया पेड्रो डिसिल्वा या आजी जगातल्या सर्वाधिक वयोवृद्ध महिला असल्याचा दावा केला जात आहे. १० मार्च १९०५ रोजी त्यांचा जन्म झाला होता. सध्या त्यांचं वय ११९ वर्षे आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्राझीलियन सरकारनं दिलेलं त्यांच्या जन्मतारखेचं आयडी कार्डही त्यांच्याकडे आहे. ब्रिटिश नियतकालिक ‘द सन’च्या म्हणण्यानुसार डेओलिरा आजींकडे त्यांचं जन्माचं अधिकृत, सरकारी प्रमाणपत्र असल्यामुळे त्यावर शंका घेतली जाऊ शकत नाही. त्यानुसार डेओलिरा आजी आजच्या घडीला जगातल्या सर्वात ज्येष्ठ महिला ठरतात. पण मग यासंदर्भातील दावे आणि प्रतिदावे पाहता जगात सर्वाधिक ज्येष्ठ आहे तरी कोण? - तर आता यासंदर्भात साओ पाउलो युनिव्हर्सिटीच्या संशोधकांतर्फे संशोधनही केलं जाणार आहे.
जगात आजच्या घडीला सर्वाधिक उन्हाळे-पावसाळे पाहिलेली व्यक्ती कोण, याचा निकाल लागेल तेव्हा लागेल, पण ब्राझीलच्या या डेओलिरा आजींना मात्र याचा काहीही फरक पडत नाही. आपण आपलं मस्तीत, आनंदात जगायचं असा त्यांचा फंडा आहे. अख्खं ब्राझील आण ब्राझीलचा मीडिया त्यांना ‘गोल्डन ओल्डी’ या नावानं ओळखतो. खरं तर त्यांनीच डेओलिरा आजींना प्रेमानं हे नाव दिलं आहे. डेओलिरा आजींना मुलं, नातू, पणतू, खापरपणतूही आहेत. मुख्य म्हणजे त्यांचं कुटुंब खूप प्रेमानं त्यांची काळजी घेतं. डेओलिरा आजींच्या भावा-बहिणींपैकी कोणीही आता जिवंत नाही. आजींना सात मुलं होती. त्यातली चार आता हयात नाहीत. आपल्या कुटुंबात त्यांनी आतापर्यंत १०४ जणांचा जन्म पाहिला आहे.
‘गोल्डन ओल्डी’ आजी आता ११९ वर्षांच्या असल्या तरी त्या अजून १० वर्षं नक्की जगतील, असं त्यांच्या कुटुंबीयांना वाटतं. डेओलिरा आजींही यासंदर्भात आशावादी आहेत.
आजींची नात डोरोतिया फरेरा डिसिल्वा म्हणते, आजींच्या वयावर जाऊ नका. त्या ११९ वर्षांच्या असल्या तरी अजूनही ॲक्टिव्ह आहेत. त्यांची बरीच कामं त्या स्वत:च्या स्वत: करतात. आमच्या घरातल्या कोंबड्या आणि इतर जनावरांची देखभाल आजही त्या स्वत: करतात. त्यांच्या खाण्यापिण्यावरही काहीही बंधनं नाहीत. एखादा किरकोळ अपवाद वगळता सगळे खाद्यपदार्थ त्या आजही खातात. त्यांच्या प्रकृतीची काहीही तक्रार नाही. आजी किमान १३० वर्षं तरी जगतील, अशी आम्हाला आशा आहे. त्यांच्या ज्येष्ठतेचं रेकॉर्ड कोणीच मोडू शकणार नाही, याची त्यांच्या कुटुंबीयांना खात्री आहे.
ब्राझीलचे एक सुप्रसिद्ध डॉक्टर जुएर डी परेरा सांगतात, ‘गोल्डन ओल्डी’ आजी जगातल्या सर्वांत ज्येष्ठ व्यक्तींचं रेकॉर्ड मोडू शकतात, कारण अनेक गोष्टी त्यांच्या बाजूनं आहेत. एकतर त्या अजूनही ॲक्टिव्ह आहेत, शिवाय संपूर्ण परिवार त्यांच्या सोबत आहे. ते त्यांची काळजी घेतात. प्रेमानं त्यांची देखभाल करतात. दीर्घायू होण्यासाठी मानसिक सपोर्ट असणं ही गोष्टही खूपच महत्त्वाची ठरते. त्यांचा एकत्रित आणि हसरा परिवार अनेक नागरिकांसाठी आश्चर्याची गोष्ट आहे. या काळात ही गोष्ट अतिशय दुर्मिळ, पण हवीहवीशी आहे, असं त्यांचं म्हणणं आहे.
डेओलिरा आजी सध्या ब्राझीलच्या इटापेरूना इथे राहतात. आजींनी आजवर एवढे उन्हाळे-पावसाळे पाहिलेत म्हणून लोकांनाही त्यांचं खूप कौतुक आहे. एवढंच नव्हे, अशी बुजुर्ग महिला म्हणजे देवाचाच अवतार आहे, असं अनेकांना वाटतं. त्यामुळे त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि आपल्या मुलांचा माथा त्यांच्या चरणी टेकवण्यासाठीही अनेक जण त्यांच्याकडे येत असतात.
आमची आजीच जगात सर्वांत मोठी!
जगातल्या आजवरच्या अनेक महत्त्वाच्या घडामोडींच्या डेओलिरा आजी साक्षीदार आहेत. दोन्ही महायुद्धंही त्यांनी पाहिली आहेत. अमेरिकेच्या ब्रायन्स मोरेरा आजी या सध्या जगातल्या सर्वाधिक वृद्ध महिला मानल्या जात असल्या तरी डेओलिरा आजी त्यांच्यापेक्षाही दोन वर्षांनी मोठ्या आहेत. यासंदर्भातले सारे पुरावे आमच्याकडे आहेत, त्यामुळे हा मान आमच्या आजीलाच मिळायला हवा, त्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू, असं त्यांच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे.