व्हर्जिनियातील सरकारी इमारतीत गोळीबार; १२ जण ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2019 04:46 AM2019-06-02T04:46:40+5:302019-06-02T04:47:01+5:30
हल्लेखोर ठार, सहा जण जखमी; व्हर्जिनिया बीचच्या इतिहासातील सर्वाधिक विध्वंसक दिवस
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या व्हर्जिनिया राज्यातील एका महानगरपालिकेच्या इमारतीत पालिकेच्याच एका कर्मचाऱ्याने आपल्या सहकाऱ्यांवर केलेल्या अंदाधुंद गोळीबारात १२ जण ठार, तर सहा जण जखमी झाले. पोलिसांनी केलेल्या कारवाईत हल्लेखोरही ठार झाला आहे.
अमेरिकेच्या दक्षिण किनारपट्टीवरील व्हर्जिनिया बीच शहरात ही घटना घडली. हल्लेखोराने शहरातील सार्वजनिक सुविधा इमारतीच्या (पब्लिक युटिलिटी बिल्डिंग) अनेक मजल्यांत धुमाकूळ घालत गोळीबार केला.
शहराचे पोलीस प्रमुख जेम्स केर्व्हेरा यांनी पत्रकारांना सांगितले की, हल्लेखोराने पोलिसांवरही गोळीबार केला. त्यातील एक गोळी एका पोलीस जवानाला लागली. तथापि, बुलेटप्रूफ जाकिटामुळे तो वाचला. हा जवान जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. व्हर्जिनिया बीच शहराचे महापौर बॉबी डायर यांनी घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी म्हटले की, व्हर्जिनिया बीचच्या इतिहासातील हा सर्वाधिक विध्वंसक दिवस आहे. घटनेत सापडलेले लोक आमचे मित्र, सहकर्मी, शेजारी आणि सहकारी आहेत.
व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्याने सांगितले की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना घटनेची माहिती देण्यात आली आहे. ते परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. व्हर्जिनियाचे गव्हर्नर राल्फ नॉर्थम यांनी घटनास्थळाला भेट दिली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांना सांगितले की, व्हर्जिनिया राष्ट्रकुलसाठी हा एक भयंकर दिवस आहे.
तो महानगरपालिकेत अभियंता होता
हल्लेखोराची ओळख पटली असून, डेवेन कार्डडॉक (४0), असे त्याचे नाव आहे. तो व्हिर्जिनिया बीच महानगरपालिकेच्या सार्वजनिक सेवा विभागात अभियंता होता. गेल्या अनेक वर्षांपासून तो स्थानिक रस्ते प्रकल्पांसाठी माहिती अधिकारी म्हणूनही काम पाहत होता. तो एक नाराज कर्मचारी होता, असे व्हर्जिनिया सरकारच्या सूत्रांनी सांगितले.