इराणकडून भारतीयांसाठी गुडन्यूज; इस्लामिक देशाने पहिल्यांदाच घेतला निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2023 09:14 AM2023-12-16T09:14:37+5:302023-12-16T09:15:09+5:30
एका अधिकृत घोषणेनुसार भारताला व्हिसा सवलत असलेल्या देशांच्या यादीत आता इराणचेही नाव जोडले आहे.
नवी दिल्ली - भारत आणि इराण या दोन्ही देशांत घनिष्ट मैत्रीपूर्ण संबंध राहिले आहेत. अमेरिकेनं इराणवर काही निर्बंध लागले असून देशाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे, इराण काहीसा अलिप्त पडला होता. मात्र, आता पुन्हा एकदा इराणने सर्वच देशांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यास सुरुवात केली आहे. मैत्रीपूर्ण संबंधासह पर्यटन विकासालाही चालना देण्याचं इराणकडून होत आहे. त्यासाठी, देशाने काही ठोस पाऊलं उचलण्यास सुरूवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून भारतीय नागरिकांना इराणमध्ये जाण्यासाठी आता व्हिसा आवश्यक असणार नाही.
एका अधिकृत घोषणेनुसार भारताला व्हिसा सवलत असलेल्या देशांच्या यादीत आता इराणचेही नाव जोडले आहे. या यादीत रशिया, सौदी अरब, कतार, जपान आणि युएईसह एकूण ३२ देशांची नावे आहेत. इराणमधील अधिकृत न्यूज एजन्सी IRNA च्या वृत्तानुसार, आता भारतीयांनाही इराणभ्रमंतीसाठी व्हिजाची अट शिथील करण्यात आली आहे. इराणमधील पर्यटन वाढीस लावण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले आहे. इराणसह श्रीलंका आणि मलेशिया देशांनीही भारतीय नागरिकांना त्यांच्या देशातील प्रवेशासाठी व्हीसा बंधनकारक असणार नाही. हे दोन्ही देशही भारतीय पर्यटकांना आकर्षित करत आहेत.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयानुसार, भारताचा इराणसोबत यापूर्वीच करारानुसार व्हीसामध्ये सूट देण्यात आली आहे. त्यानुसार, भारतीय राजकीय नेत्यांना इराणमध्ये राहण्यासाठी व्हिसामध्ये सवलत दिली जाते. मात्र, पहिल्यांदाच एका इस्लामिक देशाने भारतातील सर्वसामान्य नागरिकांना व्हीसा सवलत देण्याची ही पहिलीच वेळ आहे. दरम्यान, भारतीय नागरिकांना पासपोर्ट आवश्यक असणार आहे.
काय म्हणाले विदेशमंत्री
इराणचे पर्यटनमंत्री एजातुल्ला जर्गहामी यांनी बुधवारी वृत्तसंस्था आईआरएनएशी बोलताना म्हटले की, अधिकााधिक पर्यटनाच्या उद्देशाने इराण सरकारने हा निर्णय घेतला आहे. तसेच, पश्चिमी भागात इराणच्याविरुद्ध दिसणाऱ्या इराणोफोबियांविरुद्ध लढा देणं हा आहे, असे जर्गहामी यांनी म्हटलं.
दरम्यान, इराण आणि भारत देशात नेहमीच चांगले संबंध राहिले आहेत. येथील चाबहार बंदर प्रोजेक्टमध्येही भारताची प्रमुख भागिदारी राहिली आहे. गतवर्षी ऑगस्ट महिन्यात दक्षिण अफ्रीकेतील जोहान्सबर्गमध्ये आयोजित BRICS शिखर सम्मेलनादरम्यान इराणही या परिषदेत सहभागी झाला आहे. भारत हा ब्रिक्सचा महत्त्वाचा सदस्य आहे. तर, इराण १ जानेवारी २०२४ पासून अधिकृतपणे ब्रिक्सचा सदस्य असणार आहे.