भारतीयांसाठी दिलासादायक बातमी; UAE मध्ये आता ५ दिवसांत मिळणार वर्क परमिट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2024 01:33 PM2024-03-08T13:33:41+5:302024-03-08T13:34:58+5:30
वर्क बंडल ही योजना युएईच्या झीरो ब्यूरोक्रेसीचा पहिला टप्पा आहे
दुबई - संयुक्त अरब अमीरातच्या सरकारने खासगी कंपन्यामधील कर्मचाऱ्यांची वर्क परमिट प्रक्रिया आता सुलभ केली आहे. त्यासाठी वर्क बंडल नावाची मोहिम हाती घेतली आहे. ज्याचा पहिला टप्पा दुबईत सुरू झाला. हळूहळू इतर भागात हे लागू केले जाईल. आता कंपन्यांना केवळ ५ दिवसांत वर्क परमिट मिळेल. याआधी या प्रक्रियेसाठी ३० दिवसांचा अवधी लागत होता. सरकारने या प्रक्रियेत आवश्यक १६ कागदपत्रांमध्ये घट केली असून आता फक्त ५ महत्त्वाची कागदपत्रे अर्जासह द्यावी लागतील.
सरकारच्या या प्रक्रियेअंतर्गत आता सेवा केंद्रावर फक्त दोनदा जावे लागेल. यूएई सरकारच्या मीडिया ऑफिसने सांगितले की, वर्क बंडल स्कीममधून खासगी कंपन्यांना आता एकाच प्लॅटफॉर्मवर सर्व सुविधा उपलब्ध होतील. ज्यात नवीन परमिट काढणे, एखादे परमिट रद्द करणे, मेडिकल सेवा आणि फिंगरप्रिंटसारखी कामे केली जातील. ही योजना अशावेळी लागू करण्यात आली आहे जेव्हा भारत आणि यूएई यांच्यातील संबंध दृढ होत चाललेत. सध्या संयुक्त अरब अमीरातमध्ये ३५ लाख भारतीय राहतात.
वर्क बंडल ही योजना युएईच्या झीरो ब्यूरोक्रेसीचा पहिला टप्पा आहे. यूएईचे पंतप्रधान आणि दुबईचे शासक महामहिम शेख मोहम्मद बिन राशीद उल मकतूम यांनी म्हटलं की, सरकारमधील या प्रक्रिया सुव्यवस्थित करणे हा आमचा हेतू आहे. वर्क बंडलची व्याख्या एक अग्रणी परियोजना असून त्यात निवास आणि रोजगार संबंधित प्रक्रियांना गती देणे, सुलभ बनवणे यासाठी आहे.