गुड न्यूज! चीनमध्ये २४ तासांत नाही एकही मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2020 05:30 AM2020-04-08T05:30:04+5:302020-04-08T05:30:18+5:30
राष्ट्रीय आरोग्य आयोगाची माहिती : जानेवारीपासून प्रथमच दिवसात एकही बळी नाही; अनेक ठिकाणी लॉकडाऊन हटवले
नवी दिल्ली : जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचे माहेरघर ठरलेल्या चीनमधून एका आनंदाची बातमी आहे. तेथे ‘कोविड-१९’ या जीवघेण्या आजारामुळे गेल्या २४ तासांत एकही मृत्यू झालेला नाही.
कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या ‘कोविड-१९’ या अतिशय घातक अशा संसर्गजन्य रोगाचा जन्म चीनमधील वुहान शहरातून झाला. तेथून तो जगभर पसरला. अमेरिका, स्पेन, इटली, जर्मनी, फ्रान्स या देशांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. असे असतानाच ‘मागील २४ तासांत आमच्या देशात कोरोना विषाणूमुळे एकही मृत्यू झालेला नाही,’ असे चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने मंगळवारी अधिकृतरित्या जाहीर केले आहे. उपलब्ध माहितीनुसार, चीनमध्ये कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण मागील वर्षी १० डिसेंबर रोजी आढळला होता. यंदा जानेवारीपासून तेथील राष्ट्रीय आरोग्य आयोगाने याची आकडेवारी द्यायला प्रारंभ केला. तेव्हापासून या विषाणूमुळे मृत्यू झाला नाही, असे आजच पहिल्यांदा घडले. मार्च महिन्याच्या दुसºया आठवड्यापासून ‘कोविड-१९’चे रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी व्हायला सुरुवात झाली असल्याचेही आयोगाने नमूद केले आहे. चीननंतर लागण झालेल्या इटली, स्पेन, अमेरिका या देशांना मात्र या रोगाचा भयानक फटका बसला आहे. इटलीत एकूण १ लाख ३२ हजार ५४७ रुग्ण आढळले असून त्यापैकी १६ हजार ५२३ जणांचा बळी गेला.
स्पेनमध्ये १ लाख ४० हजारांवर रुग्णांपैकी १३ हजार ७९८ जणांना प्राण गमवावे लागले. जगात आतापर्यंत आढळलेल्या सुमारे १३ लाख ७९ हजार रुग्णांपैकी सर्वाधिक ३ लाख ७७ हजार एकट्या अमेरिकेतील आहेत. तेथे आतापर्यंत ११ हजार ७८१ नागरिकांचा बळी गेला आहे.
८१ हजार ७४० पैकी ७७ हजार १६७ रुग्ण बरे!
४चीनमध्ये आतापर्यंत ८१ हजार ७४० रुग्ण आढळले असून त्यापैकी ७७ हजार १६७ रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तेथे कोरोना विषाणूचे आजघडीला केवळ १ हजार १४२ रुग्ण आहेत. ‘कोविड-१९’ या रोगाने तेथे आतापर्यंत ३ हजार ३३१ बळी घेतले आहेत.
४मागील २४ तासांत चीनमध्ये ३२ नवे रुग्ण आढळले आहेत.
मात्र, ते सर्व विदेशी नागरिक आहेत. चीनमध्ये जनजीवन
हळूहळू पूर्वपदावर येत आहे. अनेक ठिकाणी लॉकडाऊन हटविण्यात येत आहे. वुहान शहरातील लॉकडाऊन पूर्णपणे हटविण्यात आले नसून तरी तेथील स्थानिक प्रशासनाने ४५ परिसरांना ‘महामारीमुक्त’ घोषित केले आहे. लॉकडाऊन हटविण्याची ही प्रक्रिया सुरू असतानाच जगातील अनेक देशांनी चीनला कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी आवश्यक वैद्यकीय उपकरणांची मागणी केली आहे.