गूड न्यूज : छळणाऱ्या चिकनगुनियावर आली लस
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2023 06:34 AM2023-11-11T06:34:52+5:302023-11-11T06:35:06+5:30
या लसीत चिकनगुनियाला कारणीभूत असलेल्या जिवंत विषाणूच्या आवृत्तीचा अंतर्भाव आहे.
वॉशिंग्टन : प्रचंड सांधेदुखीने बेजार करून सोडणाऱ्या चिकनगुनियापासून तुम्हाला लवकरच मुक्ती मिळणार आहे. अमेरिकी शास्त्रज्ञांनी या विषाणूजन्य आजारावर लस विकसित केली आहे. तेथील अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) १८ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींसाठी या लसीला मंजुरी दिली आहे. ‘इक्स्चिक’ असे या लसीचे नाव असून, चिकनगुनियावरील ही पहिली लस आहे.
या लसीत चिकनगुनियाला कारणीभूत असलेल्या जिवंत विषाणूच्या आवृत्तीचा अंतर्भाव आहे. ‘इक्सचिक’चा डोस स्नायूमध्ये दिला जातो. वैद्यकीय चाचण्यांत ही लस चिकनगुनियाच्या प्रतिबंधात प्रभावी असल्याचे आढळून आले. लसीकरणात सहभागी २६६ जणांची प्लेसबो घेतलेल्या ९६ स्वयंसेवकांच्या रोगप्रतिकारक प्रतिसादाची तुलना करण्यात आली. लस घेतलेल्या व्यक्तींत या रोगाविरुद्ध समर्थपणे लढू शकतील एवढ्या अँटीबाॅडीज तयार झाल्याचे आढळून आले. (वृत्तसंस्था)