ओबामांचा अमेरिकींना अलविदा
By Admin | Published: January 12, 2017 01:13 AM2017-01-12T01:13:09+5:302017-01-12T01:13:09+5:30
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या भावनिक भाषणात अमेरिकी नागरिकांना अलविदा केला.
शिकागो : अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या भावनिक भाषणात अमेरिकी नागरिकांना अलविदा केला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडीनंतर देशातील राजकीय वातावरणावर त्यांनी भाष्य केले. तर, लोकशाहीला वर्णव्देष, विषमता आणि भेदभाव यांच्यापासून निर्माण झालेल्या धोक्यापासून त्यांनी नागरिकांना सतर्क केले. ओबामा यांचा कार्यकाळ २० जानेवारी रोजी समाप्त होणार आहे. तर, रिपब्लिकन पार्टीचे डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे ४५ वे अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत.
ओबामा (५५) यांनी येथे २० हजार नागरिकांना संबोधित केले. ते म्हणाले, बदल घडवून आणण्यासाठी माझ्या योग्यतेवर नव्हे, तर स्वत:वर विश्वास ठेवा. ५५ मिनिटांच्या आपल्या भाषणात ते म्हणाले की, आपण तो विश्वास कायम ठेवा जो आमच्या स्थापनेच्या दस्तऐवजात लिहिला गेलेला आहे. होय, आम्ही हे करु शकतो. लोकशाहीच्या संभाव्य धोक्याबाबत बोलताना ते म्हणाले की, जेंव्हा आम्ही भितीच्यासमोर झुकतो तेंव्हा लोकशाहीवर त्याचा प्रतिकूल परिणाम होतो. बाह्य आक्रमक गोष्टींपासून सतर्क रहायला हवे. आमचे मूल्य, तत्व यामुळेच आज आम्ही वर्तमान स्थितीत आहेत. ते मूल्य आम्ही जपले पाहिजे.
ओबामा म्हणाले की, २००८ च्या कृष्णवर्णीय अध्यक्षाच्या रुपातील त्यांच्या ऐतिहासिक निवडीनंतरही वर्णभेद समाजात टिकून आहे. फुटीरवादी ताकदीच्या स्वरुपात हा वर्णभेद कायम आहे. आपल्या निवडीनंतर अशी चर्चा होती की, अमेरिका आता वर्णभेदाच्या पलीकडील देश असेल. पण, ही वस्तुस्थिती नाही, हे त्यांनी मान्य केले. दरम्यान, आगामी आठवड्यात ट्रम्प यांना सत्तेचे शांतीपूर्वक हस्तांतरण करण्याचा शब्द ओबामा यांनी दिला. मुस्लिम नागरिकांना देशात प्रवेशापासून रोखण्याच्या ट्रम्प यांच्या मुद्याचा धागा पकडून ओबामा म्हणाले की, ते लोकही तितकेच देशभक्त आहेत जितके आम्ही आहोत. (वृत्तसंस्था)
पत्नी मिशेल, मुलींचे मानले आभार
आपल्या निरोपाच्या भावनिक भाषणात ओबामा यांनी पत्नी मिशेल, मुली मालिया आणि साशा यांचेही आभार मानले. ओबामा म्हणाले की, आपल्या स्वप्नांच्या पूर्तीसाठी मिशेलने खूप त्याग केला आहे.
ती माझी सर्वांत चांगली ‘मित्र’ आणि नव्या पिढीसाठी एक आदर्श आहे. येथे पहिल्या रांगेत मिशेल आपली लहान मुलगी मालिया आणि आईसोबत बसल्या होत्या. ओबामांनी मिशेल यांचे आभार मानले तेंव्हा त्यांच्या सन्मानार्थ सर्व उपस्थित जागेवर उभे राहिले.
दरम्यान, मालिया आणि साशा यांच्याबद्दल बोलताना ओबामा म्हणाले की, अतिशय असामान्य परिस्थितीत आपण दोघी सुंदर आणि स्मार्ट तरुणींच्या रुपात समोर आल्या. पण, महत्वाचे हे आहे की, आपण खूप दयाळू , वैचारिक पाया असलेल्या आणि भरपूर उत्साह असलेल्या आहात.
मी आयुष्यात जे काही केले आहे त्यात मला सर्वात जास्त गर्व याचा आहे की, मी अशा मुलींचा वडील आहे. ओबामा यांनी यावेळी उपाध्यक्ष जोए बाइडेन यांचेही आभार मानले.
ते म्हणाले की, उमेदवार म्हणून तुम्ही माझी पहिली पसंत होतात. आपण एक चांगले उपाध्यक्ष होतात. तर, या काळात मला एक चांगला भाऊ मिळाला आहे.