गुगलने तालिबानी अॅप प्ले स्टोअरमधून काढून टाकले
By admin | Published: April 5, 2016 09:05 AM2016-04-05T09:05:16+5:302016-04-05T09:05:16+5:30
इस्लाम मुलतत्ववाद्यांनी तयार केलेले अॅप गुगल प्ले स्टोअरमधून काढून टाकण्यात आले आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
काबूल, दि. ५ - इस्लाम मुलतत्ववाद्यांनी तयार केलेले अॅप गुगल प्ले स्टोअरमधून काढून टाकण्यात आले आहे. हे अॅप पाश्तो भाषेत होते. तसंच या अॅपमधून अफगाणिस्तान चळवळीसंबंधी फोटो आणि व्हिडिओ शेअर केले जात होते. 1 एप्रिलला हे अॅप लाँच करण्यात आले होते. मात्र लगेचच गुगुल प्ले स्टोअरमधून हे अॅप काढून टाकण्यात आले आहे. तांत्रिक समस्येमुळे हे अॅप बंद झाल्याचा दावा या ग्रपुने केला आहे.
बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार गुगल अॅप पॉलिसीनुसार भडकाऊ भाषण देणे नियमांच्या विरोधात आहे. या नियमाचे उल्लघंन केल्यामुळेच हे अॅप काढून टाकण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. अमेरिकेतील साईट इंटेल ग्रुपने ही माहिती पुरवली होती त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. जिहादींच्या सर्व हालचालींवर साईट इंटेल ग्रुप लक्ष ठेवून असतो. गुगलने मात्र यासंबंधी काही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.
'आमच्या युजर्स आणि डेव्हलपर्सना चांगला अनुभव मिळावा या हेतूने पॉलिसी तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आमच्या पॉलिसीचं उल्लंघन करणा-यांचे अॅप आम्ही काढून टाकतो', अशी माहिती गुगलने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकातून दिली आहे. 'जागतिक स्तरावर प्रेक्षक तयार करण्यासाठी हे अॅप आमच्या प्रगत तंत्रज्ञानाचा हा भाग होता', असं तालिबानच्या प्रवक्त्याने ब्लूमबर्गशी बोलताना सांगितलं आहे.