पैसे वाचवण्यासाठी पार्किंग लॉटमध्ये राहणारे गुगलर

By Admin | Published: January 14, 2016 02:56 PM2016-01-14T14:56:16+5:302016-01-14T15:04:59+5:30

असेही काही कर्मचारी गुगलमध्ये आहेत, जे महिनोन महिने गुगलच्या कँपसच्या बाहेरही गेलेले नाहीत. ते चक्क पार्किंग लॉटमध्ये राहतात

Google Keeper in a parking lot to save money | पैसे वाचवण्यासाठी पार्किंग लॉटमध्ये राहणारे गुगलर

पैसे वाचवण्यासाठी पार्किंग लॉटमध्ये राहणारे गुगलर

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
लॉस एंजलिस, दि. १४ - कर्मचा-यांना सर्वाधिक मानधन देणारी कंपनी अशी गुगलची ओळख आहे. कामाची वेळ संपल्यावरही तासन तास कामासाठी थांबणारे असंख्य कर्मचारी गुगलमध्ये आहेत. विशेष म्हणजे, असेही काही कर्मचारी गुगलमध्ये आहेत, जे महिनोन महिने गुगलच्या कँपसच्या बाहेरही गेलेले नाहीत. ते चक्क पार्किंग लॉटमध्ये राहतात आणि उरलेल्या वेळात ऑफिसमध्ये असतात. अशाच काही गुगल एम्प्लॉइजची ही ओळख:
 
बेन डिस्क - हा गुगलच्या कँपसमध्ये ऑक्टोबर २०११ ते नोव्हेंबर २०१२ असे १३ महिने राहिला. आधीच्या घराचं कर्ज आणि पोटगी द्यायला लागत असल्यामुळं घराचं भाडं द्यायला परवडत नाही अशी स्थिती. मग त्यानं पार्किंग लॉटमध्येच राहण्याचा मार्ग निवडला, जो अत्यंत सोयीस्कर असल्याचा त्याचा दावा आहे. काहीवेळा सुरक्षारक्षकांनी त्याला हटकलं, परंतु तो गुगलला वाहून घेतलेला कर्मचारी आहे हे कळल्यावर त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं.
 
 
ब्रँडन ऑक्झेडिन - २०१३ मध्ये जून ते डिसेंबर असे सात महिने तो गुगलच्या पार्किंग लॉटमध्ये राहिला. एक स्टेशन वॅगन, चटया आणि काचांना लावायला पडदे एवढी सामग्री विकत घेऊन त्यानं सात महिने काढले. हे कशासाठी तर पैसे वाचवण्यासाठी.
 
मॅथ्यू वीव्हर - करीअरसाठी बेस्ट मार्ग म्हणून हे धाडस आपण केल्याचं मॅथ्यू सांगतो. कँपसमध्ये झोपायला परवानगी देण्याचं गुगलचं धोरण नाहीये, परंतु विशेष म्हणजे ज्यावेळी वीव्हर जागेवर नसायचा त्यावेळी सुरक्षारक्षक चक्क त्याचा मोबाईल सांभाळायचे. यापुढची आश्चर्याची बाब म्हणजे कधी कधी वीव्हर दोस्तकंपनीबरोबर पार्किंग लॉटमधल्या गाडीत पार्टीही करायचा. मात्र, मैत्रिणींना गाडीत राहण्याचं कारण सांगायची वेळ आली की त्याची पंचाईत व्हायची.
 
लंडनमधल्या गुगलच्या कार्यालयात बदली झालेला एक कर्मचारी तर राहण्याची सोय होईपर्यंत ऑफिसमध्येच राहिला होता. पार्किंग लॉट किंवा ऑफिसमध्ये राहणारे गुगलर सांगतात, हे काही फारसं अवघड नाहीये, कारण जिममध्ये आंघोळी व अन्य प्रातर्विधी करायची सोय असते आणि कँटिनमध्ये पोटाचा प्रश्न सुटतो.
 
 
काही जणांनी असं राहून पैसे वाचवले आणि ते नंतर जगभ्रमंतीमध्ये खर्च केले. जर जग फिरायचं तर पैसे लागतात, त्याचबरोबर कसंही नी कुठेही राहायची सवय लागते. या दोन्ही गोष्टी गुगलच्या पार्किंग लॉटनं सोडवल्याचं एकानं म्हटलंय. तर एका गुगलरनं तीन वर्षं गुगलच्या कँपसमध्ये तंबू ठोकून राहिल्याची आणि वाचवलेल्या पैशातून घर विकत घेतल्याची वदंता आहे. यासंदर्भात quora च्या गुगल कँपस थ्रेडमध्ये अनेक रंजक घटना दिलेल्या आहेत.

Web Title: Google Keeper in a parking lot to save money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.