#Metoo : अँडी रुबिनला गुगलकडून वाचविण्याचे प्रयत्न; 660 कोटींची नुकसानभरपाई
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 08:56 AM2018-10-26T08:56:29+5:302018-10-28T09:18:49+5:30
आपल्या कर्मचाऱ्यांना चांगल्या सुविधा देण्यासाठी प्रसिद्ध असलेली कंपनी गुगलमध्येही लैंगिक शोषणाची बरीच प्रकरणे घडली आहेत. खुद्द गुगलचे सीईओ सुंदर पिचई यांनीच ही माहिती दिली आहे.
वॉशिंग्टन : आपल्या कर्मचाऱ्यांना चांगल्या सुविधा देण्यासाठी प्रसिद्ध असलेली कंपनी गुगलमध्येहीलैंगिक शोषणाची बरीच प्रकरणे घडली आहेत. अँड्रॉईड या जगप्रसिद्ध ऑपरेटींग सिस्टिमचा जन्मदाता अँडी रुबिन याला एका सहकारी महिलेवर ओरल सेक्ससाठी बळजबरी केल्याच्या आरोपातून वाचविण्याचा प्रयत्न केल्यामुळे गुगलवर कर्मचारी संतप्त झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे गुगलने रुबिनला नोकरी सोडण्याच्या बदल्यात 660 कोटी रुपये दिले आहेत.
गुगलचे सीईओ सुंदर पिचई यांनीच ही माहिती दिली आहे. पिचई यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना केलेल्या ई-मेलमध्ये गेल्या दोन वर्षांत तब्बल 48 कर्मचाऱ्यांना लैगिक शोषणाच्या आरोपांमुळे हकालपट्टी केल्याचे म्हटले आहे. यामध्ये कंपनीच्या व्यवस्थापन विभागातील काही वरिष्ठ पदावरील अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.
जगभरात #MeToo ने भूकंप घडवून आणला असताना माहिती जालाची सर्वात मोठी कंपनी गुगलनेही आपल्या कंपनीमध्ये महिला सुरक्षित नसल्याचे कबूल केले आहे. सीईओ सुंदर पिचई यांनी याबाबत कंपनीच्या कर्मचाऱ्यांना आश्वस्त करण्यासाठी मेल केला आहे. यामध्ये त्यांनी गेल्या दोन वर्षांत 48 जणांवर कारवाई केल्याचे फॉक्स न्यूजने म्हटले आहे.
या ईमेलवर गुगलचे उपाध्यक्ष (कामकाज) इलीन लॉटॉन यांच्याही सह्या आहेत. या इमेलमध्ये त्यांनी कर्मचाऱ्यांवा सहकारी कर्मचाऱ्याबरोबर कोणत्याही प्रकारचे संबंध न ठेवण्याचा उपदेश करण्यात आला आहे. गुगल त्याच्या धोरणांमध्ये बदल करत असून असे आढळल्यास कारवाई होईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
अँड्रॉईडचा निर्माता अँडी रुबिन याला 2013 मध्ये महिला सहकाऱ्याने लैगिक शोषण केल्याचे आरोप केले होते. या महिलेला एका हॉटेलमध्ये नेत ओरल सेक्स करण्याची बळजबरी रुबिन याने केली होती. या महिलेसोबत रुबिनचे प्रेमप्रकरणही सुरु होते, असे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये गुगलच्या दोन अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. या आरोपांनंतर गुगलचे तत्कालीन सीईओ लॅरी पेज यांनी रुबिनला राजीनामा देण्यास सांगितले होते.
या रुबिनला बऱ्याचदा गुगलने वाचविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप काही कर्मचाऱ्यांनी केला आहे. तसेच एखादा कर्मचारी दोषी असताना नोकरीवरून कमी करताना त्याला नुकसान भरपाई म्हणून 660 कोटी रुपये कसे काय दिले जातात, असा प्रश्नही उपस्थित केला आहे.