फ्रान्समध्ये १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मोफत कंडोम वाटप करणार सरकार, राष्ट्रपतींची घोषणा! कारण काय? वाचा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 12:38 IST2022-12-12T12:37:41+5:302022-12-12T12:38:41+5:30
फ्रान्समध्ये ‘नको असलेली गर्भधारणा’ आणि तरुणांमध्ये ‘लैंगिक संक्रमित संसर्ग’चे प्रमाण वाढले आहे. त्यावर लगाम घालण्यासाठी फ्रान्स सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे.

फ्रान्समध्ये १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मोफत कंडोम वाटप करणार सरकार, राष्ट्रपतींची घोषणा! कारण काय? वाचा...
नवी दिल्ली-
फ्रान्समध्ये ‘नको असलेली गर्भधारणा’ आणि तरुणांमध्ये ‘लैंगिक संक्रमित संसर्ग’चे प्रमाण वाढले आहे. त्यावर लगाम घालण्यासाठी फ्रान्स सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी देशात १८ ते २५ वयोगटातील तरुणांना जानेवारी महिन्यापासून मोफत कंडोम देणार असल्याची घोषणा केली आहे.
सर्व फार्मसीमध्ये, १ जानेवारीपासून १८ ते २५ वयोगटातील लोकांसाठी कंडोम मोफत असतील. फ्रान्ससमोर लैंगिक शिक्षणाविषयी आव्हान आहे, हा निर्णय म्हणजे प्रतिबंधातील एक छोटी क्रांती असल्याचे मॅक्रॉन यांनी म्हटले आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार फ्रान्समधील आरोग्य अधिकाऱ्यांनी माहिती दिली की २०२०-२१ या वर्षात लैंगिक संक्रमित रोगाचं प्रमाण ३० टक्क्यांनी वाढलं आहे. याच पार्श्वभूमीवर मॅक्रॉन यांच्या सरकारनं १८ ते २५ वर्षातील सर्व महिलांना मोफत जन्म नियंत्रण (Free Birth Control) योजना सुरू केली. त्यानंतर आता तरुणांसाठी मोफत कंडोम उपलब्ध करुन देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.
मोफत कंडोम वापराच्या घोषणेसोबतच इतरही आरोग्य संदर्भातील याआधीच्या योजना यापुढेही सुरूच राहतील असं मॅक्रॉन यांनी ट्विट करुन सांगितलं आहे. यात फार्मसीमधून सर्व महिलांना मोफत आपत्कालीन गर्भनिरोधक आणि २६ वर्षांपेक्षा लहान वयाच्या महिलांना HIV सोबतच डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय एसटीआय चाचणीचाही समावेश आहे.