६१ वर्षांची वधू, २४ वर्षांचा वर; आजीबाईच्या लग्नात २५ लाख ‘वऱ्हाडी’!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2022 08:17 AM2022-07-11T08:17:07+5:302022-07-11T08:18:18+5:30

प्रेमात पागल झालेले अनेक दीवाने आजवर तुम्ही पाहिले असतील.. प्रेम कुणावर करावं, कधी करावं, कोणत्या वयात करावं, याचं काहीही बंधन या प्रेमवीरांवर नसतं. उपदेशाच्या डोसांची कोणतीही मात्रा कधीच त्यांच्यावर चालत नाही, हेही खरं. 

Grandma, 61 and younger husband 24, are ready to have a baby got married social media online 25 lakh people for wedding | ६१ वर्षांची वधू, २४ वर्षांचा वर; आजीबाईच्या लग्नात २५ लाख ‘वऱ्हाडी’!

६१ वर्षांची वधू, २४ वर्षांचा वर; आजीबाईच्या लग्नात २५ लाख ‘वऱ्हाडी’!

googlenewsNext

जॉर्जियामधील या प्रेमी युगुलाकडेच पाहा ना.. त्यांच्या घरच्यांनीच त्यांना उपदेशाचे किती डोस पाजले, किती समजावून सांगितलं, समाजात आपली छी..थू होईल म्हणून असं काही करू नका, असंही पदोपदी विनवलं, पण या जोडप्यावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. डंके की चोटपर त्यांनी लग्न केलंच आणि सोशल मीडियावर त्याची जंगी ‘मिरवणूक’ही काढली. या जोडप्याच्या किस्स्यांनी आता सोशल मीडिया भरभरून वाहतं आहे.

कोण आहे हे जोडपं? आणि जगभरात का होते आहे या जोडप्याची चर्चा?.. या जोडप्यातील नवऱ्याचं नाव आहे कुरेन मॅकेन. त्याचं वय आहे २४ वर्षे आणि नवरीचं नाव आहे शेरील मॅकग्रेगोर. तिचं वय आहे ६१ वर्षे. या दोघांच्या वयात तब्बल ३७ वर्षांचं अंतर आहे. शेरील आजीला तर तब्बल १७ नातवंडं आहेत. या नातवंडांनीही आजीचं मन वळवून पाहिलं, तिला आपल्या प्रेमाच्या शपथा घातल्या, पण आजी कसली ऐकायला तयार? २४ वर्षीय कुरेनवर तिचं इतकं प्रेम जडलं होतं, की पाच मिनिटांसाठीही त्याचा विरह तिला सहन होत नव्हता. तिकडे कुरेनचीही तीच स्थिती होती. 

खरं तर या दोघांची पहिली भेट खूप पूर्वीच म्हणजे २०१२ सालीच झाली होती. पहिल्या भेटीतच दोघांची नजरानजर झाली आणि दोघांच्याही हृदयाची तार छेडली गेली. त्यावेळी कुरेन केवळ १५ वर्षांचा होता. शेरील आजीचा मुलगा क्रिस यांच्या फास्ट फूड रेस्टॉरंटमध्ये कुरेन त्यावेळी काम करीत होता. पण या पहिल्या भेटीनंतर बराच काळ त्यांचा संपर्क तुटला आणि प्रेमाचं हे नातं बहरू शकलं नाही. त्यानंतर तब्बल आठ वर्षांनी, म्हणजे ४ नोव्हेंबर २०२० रोजी पुन्हा एकदा या दोघांची भेट झाली आणि त्यांच्यातील प्रेमाच्या या नात्याला मग कोणीच बांध घालू शकलं नाही. सुमारे वर्षभर त्यांनी एकमेकांना डेटही केलं. 

कुरेनवरील आपलं प्रेम कसं व्यक्त करावं, त्याला कसं सांगावं, या चिंतेत आधी शेरील आजीबाई होत्या, पण कुरेननंच आजीला प्रपोज केल्यावर तिच्या आनंदाला पारावार उरला नाही. आश्चर्याच्या या धक्क्यातून बरेच दिवस ती बाहेरही आली नाही. समाजाला, विशेषत: कुरेनच्या पालकांना आणि त्यातही शेरील आजीच्या मुलांना, नातवंडांना, तिच्या नातेवाइकांना जेव्हा ही गोष्ट कळली, तेव्हा या लग्नापासून शेरील आजीला परावृत्त करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न त्यांनी केला, तिच्या सातही मुलांनी या लग्नाला विरोध केला, पण आजी बधली नाही ती नाहीच. 

शेरील आजी म्हणते, आमच्या लग्नाची गाठ स्वर्गातच बांधली गेली होती, नियतीनंच जर आमची जोडी जमवायची ठरवलेलं आहे, तर त्यात आडकाठी आणणारे तुम्ही कोण?.. अर्थातच आजीबाईंच्या या हट्टापुढे साऱ्यांचाच विरोध फिका पडला आणि दोघांनी धूमधडाक्यात लग्न केलंच. टिकटॉकवर त्यांनी आपल्या लग्नाचं लाईव्ह स्ट्रिमिंग केलं. या लग्नाला तब्बल २५ लाख लोक ऑनलाइन हजर होते! 

कुरेन म्हणतो, मी शेरीलशी लग्न केलं, ते उगाच नाही. तिच्या वयावर जाऊ नका. ती अजूनही अतिशय देखणी आहे. याशिवाय ती सर्वार्थानं स्ट्राँग आहे, मोहक आहे, अतिशय प्रेमळ आहे आणि मुख्य म्हणजे आमच्या नात्याशी ती अतिशय प्रामाणिक आहे. मला बायको म्हणून जशी मुलगी हवी होती, अगदी तश्शी, माझ्या मनासारखी मुलगी मला मिळाली. मी अतिशय खूष आहे.

नवरा-नवरीच्या घरात सजतोय पाळणा!
कुरेन आणि शेरील आजीच्या लग्नाची ही कहाणी इथेच संपलेली नाही. या दोघांनाही आता अतिशय गोंडस अशा अपत्याची प्रतीक्षा आहे. शेरील आजी सांगते, मला स्वत:लाच परत प्रत्यक्ष आई होण्याची इच्छा आहे, पण माझ्या वयामुळे ते आता शक्य नाही, पण सरोगसीनं बाळ जन्माला घालायचे किंवा मूल दत्तक घ्यायचे आमचा विचार आहे. त्यासाठी वाट्टेल तेवढा खर्च करायचीही त्यांची तयारी आहे. बाळाच्या आगमनाची तयारीही त्यांनी आत्तापासूनच सुरू केली आहे. त्यासाठीच्या आवश्यक गोष्टींची खरेदी सुरू झाली आहे. बाळाची रूम रंगबिरंगी रंगांनी आणि खेळण्यांनी सजवली जाते आहे..

Web Title: Grandma, 61 and younger husband 24, are ready to have a baby got married social media online 25 lakh people for wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.