आजी होणार आपल्याच मुलीच्या बाळाची आई!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 07:58 AM2022-04-11T07:58:17+5:302022-04-11T07:58:29+5:30
अमेरिकेत राहणारी चेल्सी स्मिथ ही ५० वर्षीय महिला. त्यांना आधीची आठ मुलं आहेत. त्यातील काहींची लग्नं झाली आहेत.
अमेरिकेत राहणारी चेल्सी स्मिथ ही ५० वर्षीय महिला. त्यांना आधीची आठ मुलं आहेत. त्यातील काहींची लग्नं झाली आहेत. त्यांना मुलंही झाली आहेत; पण चेल्सी आजीची हौसच भारी. मुलांची त्यांची हौस अजूनही भागलेली आहे. आता त्या पुन्हा गर्भवती आहेत आणि येत्या महिनाभरात आपल्या नव्या बाळाला जन्म देतील; पण ही कहाणी तशी साधीसोपी नाही. या कहाणीलाही अनेक वळणं, भावनेचे पदर आहेत.
आता चेल्सी स्मिथ ज्या बाळाला जन्म देणार, ते त्यांच्याच उदरात वाढतंय; पण तरीही ते त्यांचं नाही. त्यांना होणाऱ्या या बाळाची त्या आजी असणार आहेत. कारण हे बाळ आहे त्यांच्याच सख्ख्या मुलीचं. त्यांंची २४ वर्षांची मुलगी कॅटलिन मुनोज ही काही असाध्य आजारांनी त्रस्त आहे.
कॅटलिनला स्वत:ला कधीच आई होता येणार नाही असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. तरीही आत्ताही ती एका मुलाची आई आहेच. कारण महत्प्रयासांनी ‘आयव्हीएफ’ तंत्रज्ञानानं तिनं एक मूल जन्माला घातलं आहे. हा मुलगा आता तीन वर्षांचा आहे; पण कॅटलिनला स्वत:च्या उदरातच वाढलेलं मूल हवं होतं. एकच नाही, खरं तर आपल्याला खूप मुलं व्हावीत असं तिला वाटतं. मुलांसाठी ती आसुसलेली आहे; पण वैद्यकीय कारणांनी ती स्वत: आई होऊ शकत नाही.
मध्यंतरीच्या तीन वर्षांच्या काळातही तिनं खूप प्रयत्न केले, अनेकानेक डॉक्टरांचे उंबरठे झिजवले, ज्यांनी जे काही उपाय सुचवले, ते सारं काही तिनं करून पाहिलं; पण तिच्या स्वत:च्या पोटी मूल जन्माला येऊ शकणार नाही, हे आता जवळपास स्पष्ट झालं आहे. त्यामुळे कॅटलिन अतिशय नाराज झाली. अशावेळी तिची स्वत:ची आईच पुढे आली आणि तिनं मुलीला सांगितलं, तुझ्या स्वत:च्या पोटी मूल जन्माला येऊ शकणार नाही, म्हणून एवढी उदास, निराश कशाला होतेस? आणखी पर्याय आहेतच की. मीच होते तुझ्या बाळाची आई. ‘सरोगेट मदर’ म्हणून तुझं मूल मी माझ्या पोटी वाढवते..”
कॅटलिन, तिचा नवरा आणि अनेकांना आधी हे ऐकून धक्का बसला, आश्चर्य वाटलं.. वयाच्या पन्नाशीत आपलीच आई, आपल्या बाळासाठी सरोगेट मदर कशी बनणार, याविषयी ती साशंक तर होतीच; पण त्यासाठी आपल्याच आईला राजी करावं हे तिला प्रशस्त वाटलं नाही; पण स्मिथ आजी एकदम खमक्या. या वयात आपल्या मुलीचं मूल जन्माला घालायचंच, असा अट्टाहासच त्यांनी धरला.
मुलीच्या खुशीसाठी काहीही करायची त्यांची तयारी होती. त्यामुळे त्या स्वत:च अनेक डॉक्टरांकडे गेल्या. या वयात मी ‘सरोगेट मदर’ बनू शकते का, याविषयी सगळीकडे चौकशी केली, तपासण्या केल्या.. आश्चर्य म्हणजे या वयातही तुम्ही ‘सरोगेट मदर’ बनू शकत असल्याचं ‘सर्टिफिकेट डॉक्टरांनी दिलं. शिवाय याआधी स्मिथ यांना आठ मुलं झाली होती आणि ही सारी बाळंतपणं व्यवस्थित, कोणतीही अडचण न येता, बिनधोक पार पडली होती. त्यामुळे तोही प्रश्न मिटला होता.. स्मिथ यांनी हट्टच धरल्यावर तिची मुलगी कॅटलिन आणि जावई दोन्हीही या गोष्टीसाठी तयार झाले.
चेल्सी स्मिथ आता पन्नाशीत असल्या तरी अजूनही फिट आहेत. रोजची त्यांची दिनचर्या, लाइफस्टाईल आरोग्यपूर्ण अशी आहे. अमेरिकेतील उटा येथील ‘ही हॉ’ या फार्मच्या त्या मालक आहेत.
आयव्हीएफ तंत्रज्ञानानं झालेला कल्लहन नावाचा मुलगा कॅटलिनला आहे. ती म्हणते, मला माझं स्वत:चं आणखी मूल (खरं तर मुलं) हवं होतं. माझ्या बाळाची आई बनण्यासाठी माझीच आई तयार झाली, एवढंच नाही, त्यासाठी तिनंच पुढाकार घेतला आणि ही गोष्ट घडवून आणली हे माझ्यासाठी फारच महत्त्वपूर्ण आहे. आई-वडिलांचे उपकार आपण कधीही फेडू शकत नाहीत; पण ज्या परिस्थितीत माझी आई माझ्यासाठी धावून आली आहे, ते पाहता, मी तिचं ऋण शब्दांतसुद्धा व्यक्त करू शकत नाही. कल्लहनच्या जन्मानंतर गेल्या तीन वर्षांत मी आणि माझ्या नवऱ्यानं हरतऱ्हेचे प्रयत्न करून पाहिले, डॉक्टरी इलाज आणि शस्त्रक्रियाही करवून झाल्या; पण मी आई बनू शकणार नाही, हे लक्षात आल्यावर आम्ही दोघंही खूपच निराश झालो. आपल्याकडे आता काहीच पर्याय नाही, म्हणून हताश झालो. अशावेळी आमच्या आयुष्यात आनंद पेरण्यासाठी माझी आई नुसती पुढेच आली नाही, तर देवदुतासारखी धावून आली.
असा आनंद पुन्हा मिळणे नाही..
चेल्सी स्मिथ म्हणतात, माझी मुलगी आणि जावयाच्या चेहऱ्यावरचं दु:ख मला पाहावलं गेलं नाही. त्यामुळे सरोगसीसाठी मीच पुढाकार घेतला. खरंतर इतक्या वर्षांनी आपल्याला बाळ होणार, एवढंच नाही, तर एकाचवेळी मी आई आणि आजीही होणार यामुळे मीच खूप खुश आहे; पण आता काही दिवसांतच माझ्या मुलीचं बाळ मी जन्माला घालणार असताना, माझ्या मुलीच्या आणि जावयाच्या चेहऱ्यावरचा आनंदही मी रोज निरखते आहे. मी घेतलेल्या निर्णयाचा मला खूप अभिमान आहे. असा आनंद पुन्हा मिळणे नाही..