पृथ्वीवर २५ कोटी वर्षांपूर्वी आला होता प्रलय, ९० टक्के जीव भस्मसात; यामागचं कारण कळालं...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2021 04:05 PM2021-11-18T16:05:13+5:302021-11-18T16:05:55+5:30
पृथ्वीवर आजपासून तब्बल २५ कोटी वर्षांपूर्वी महाप्रलय आला होता आणि यात जवळपास ९० टक्के जीव भस्मसात झाले होते.
बीजिंग
पृथ्वीवर आजपासून तब्बल २५ कोटी वर्षांपूर्वी महाप्रलय आला होता आणि यात जवळपास ९० टक्के जीव भस्मसात झाले होते. गेल्या अनेक वर्षांपासून वैज्ञानिक यामागचं कारण शोधून काढण्याचा प्रयत्न करत आहेत. या संपूर्ण घटनेचा अभ्यास करत आहेत. आता चीनी वैज्ञानिकांनी या प्रलयामागचं कारण शोधून काढलं आहे. वैज्ञानिकांच्या दाव्यानुसार २५ कोटी वर्षांपूर्वी ज्वालामुखीचा स्फोट झाला होता आणि त्यानंतर पृथ्वीवर हाडं गोठतील अशा थंडीला सुरुवात झाली. यात जवळपास ९० टक्के जीव संपुष्टात आले होते.
चायनीज अकादमी ऑफ सायन्सनं दक्षिण चीनच्या सिचुआन प्रांतात तांब्याच्या खाणींचा अभ्यास करुन अनेक निष्कर्ष काढले आहेत. या खाणीमध्ये खडकांच्या विसंगतीवरुन शास्त्रज्ञांनी महत्त्वाची माहिती शोधून काढली आहे. सल्फरनं भरलेल्या उत्सर्जनाचे निशाण खडकांवर सापडले आहेत. दगडांवरील राखेच्या थरातून याची माहिती मिळाली आहे. ज्वालामुखीतून सल्फर बाहेर पडून त्यातील एरोसॉल जेव्हा वायूमंडळात पोहोचला तेव्हा सूर्याच्या किरणांची प्रखरता अत्यंत कमी झाली होती.
तापमान काही काळासाठी थेट ४ डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचलं
ज्वालामुखी झालेल्या वातावरणातील बदलामुळे आणि सूर्याची किरणं परत गेल्यानं पृथ्वीवरील तापमानात खूप घट झाली होती. बर्फाळ वातावरणामुळे जवळपास ९० टक्के सजीवांचा मृत्यू झाला होता. शास्त्रज्ञांच्या दाव्यानुसार चीनमधील ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे धरतीवरील सरासरी तापमान काही काळासाठी ४ डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचलं होतं. वातावरणातील सल्फर ज्वालामुखीमुळे २५ कोटी वर्षांपूर्वी प्रचंड प्रमाणात सजीव गोष्टींचा अंत झाला होता.