Corona Virus: मोठा दिलासा! यंदाच कोरोनाचा खात्मा होणार; डब्ल्यूएचओ म्हणतेय, फक्त गरीब देशांनाही लसी पुरवा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2022 06:25 AM2022-01-03T06:25:44+5:302022-01-03T06:26:03+5:30
corona virus may end in 2022: अमेरिकेमध्ये कोरोना रुग्णांची संख्या पाच कोटी ५८ लाखांवर पोहोचली असून, आठ लाख ४७ हजार जणांचा आजवर मृत्यू झाला.
जिनिव्हा : जगाला ग्रासून टाकणारी कोरोना साथ यंदाच्या वर्षात संपुष्टात येण्याची शक्यता आहे, असा दिलासा जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डाॅ. टेड्रोस अधनोम घेब्रिसस यांनी सर्वांना दिला आहे. विकसित देशांनी आपल्याकडील लसींचा गरीब देशांना पुरवठा केला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
कोरोना साथीचे हे आता तिसरे वर्ष आहे. घेब्रिसस म्हणाले की, यंदाच्या वर्षी कोरोना साथ संपुष्टात येणार असली तरी त्यामध्ये विकसित देशांनी गरीब देशांना कोरोना प्रतिबंधक लसी न पुरविल्यास काही अडथळे येऊ शकतात. जगात कोरोना लसींचे समप्रमाणात वाटप न झाल्यामुळेच ओमायक्रॉनसारखा नवा विषाणू निर्माण झाला. लसींच्या वाटपात असमानता असेल तर विषाणूंचे अधिकाधिक प्रकार
निर्माण होण्याचा धोका आणखी वाढतो.
बुरुंडी, कोंगो, आदी गरीब देशांमध्ये एकूण लोकसंख्येपैकी फक्त एक टक्के लोकांनाच अद्याप लस मिळाली आहे, तर श्रीमंत देशांतील ७० टक्के लोकांना कोरोना लस देण्यात आली. ही विषमतेची दरी दूर झाली तरच कोरोना साथ संपुष्टात येऊन जनजीवन पूर्वीसारखे नीट होईल. घेब्रिसस यांनी सांगितले की, कोरोना लसींनी लाखो लोकांचे प्राण वाचविले आहेत. आता या संसर्गावर नवी औषधेही उपलब्ध झाली आहेत. ज्या कोरोनाबाधितांवर रुग्णालयांत उपचार सुरू आहेत, त्यापैकी ८० टक्के लोकांना बूस्टर डोस देण्यात आलेला नाही, असेही त्यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
आजपासून मुलांचे लसीकरण
n देशात गेल्या चोवीस तासांत कोरोनाचे २७,५५३ नवे रुग्ण सापडले व २८४ जणांचा मृत्यू झाला. सक्रिय रुग्णांचा आकडा १ लाख २२ हजारांहून अधिक झाला. ओमायक्राॅनने बाधितांची संख्या १५२५ वर पोहोचली.
n १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला आज, सोमवारपासून प्रारंभ होत आहे. त्यात त्यांना लसीचा पहिला डोस दिला जाईल.
मुंबईत दिवसभरात आठ हजार रुग्ण
मुंबई : मुंबई शहर उपनगरात शनिवारी सहा हजारांवर असलेली दैनंदिन रुग्णसंख्या रविवारी आठ हजारांवर पोहोचली. मुंबईत दिवसभरात ८०६३ रुग्णांची नोंद झाली. तर राज्यात रविवारी ११,८७७ नवीन रुग्णांचे निदान आणि ९ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. राज्यात रविवारी ५० ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण निदान झाले.
५.५८कोटी
अमेरिकेत रुग्णसंख्या
n अमेरिकेमध्ये कोरोना रुग्णांची संख्या पाच कोटी ५८ लाखांवर पोहोचली असून, आठ लाख ४७ हजार जणांचा आजवर मृत्यू झाला.
n तिथे गेल्या आठवडाभरात २० लाख नवे रुग्ण सापडले आहेत. ब्राझीलमध्ये २ कोटी २२ लाख कोरोनाबाधित असून, इंग्लंडमध्ये त्यांचा आकडा एक कोटी ३१ लाख आहे.