विल्यम, केटच्या महालावर मोठा खर्च
By admin | Published: June 23, 2014 05:03 AM2014-06-23T05:03:58+5:302014-06-23T05:03:58+5:30
राजकुमार विल्यम व त्यांच्या पत्नी कॅथरिन आणि त्यांचा मुलगा राजकुमार जॉर्जसाठी केन्सिंगटन महालाच्या सजावटीवर झालेल्या खर्चाचे ब्रिटनच्या शाही कुटुंबाने समर्थन केले आहे
लंडन : राजकुमार विल्यम व त्यांच्या पत्नी कॅथरिन आणि त्यांचा मुलगा राजकुमार जॉर्जसाठी केन्सिंगटन महालाच्या सजावटीवर झालेल्या खर्चाचे ब्रिटनच्या शाही कुटुंबाने समर्थन केले आहे. हा खर्च योग्यच असल्याच्या शाही कुटुंबाच्या प्रवक्त्याने सांगितले. महालाच्या सजावटीवर झालेल्या खर्चाचे विवरण प्रवक्त्याने दिले नाही. मात्र, महालाची दुरुस्ती आणि सजावटीवर जवळपास ६८ लाख डॉलर खर्च झाले आहेत. शाही दाम्पत्याने खर्चाचा हा भार स्वत: उचलला असल्याचे सांगण्यात आले. १७ व्या शतकात लंडनमध्ये उभारण्यात आलेल्या या महालात वीजवाहिन्या व जलवाहिनींच्या दुरुस्तीसह नवे छत टाकण्याच्या खर्चाचा समावेश आहे. केम्ब्रिज के ड्यूक - डचेस विलियम व केट आधीपासून महाराणी एलिझाबेथ यांची बहीण राजकुमारी मार्गारेट यांच्या अपार्टमेंटमध्ये राहत होते. मार्गारेट यांचे २००२ मध्ये निधन झाले होते. नवविवाहित मार्गारेट केन्सिंगटन महालात राहण्यास आल्या होत्या. तेव्हा १९६३ मध्ये केन्सिंगटन महालाची यापूर्वीची अखेरची डागडुजी झाली होती. हा महाल ड्यूक आणि डचेस यांचे अधिकृत निवासस्थान आहे, असे शाही कुटुंबाच्या प्रवक्त्याने सांगितले.
केन्सिंगटन महाल पुरातत्त्व महत्त्व असलेली इमारत असून डागडुजी व सजावट करताना या पैलूकडे लक्ष देणे आवश्यक होते. त्यामुळे दुरुस्तीचे काम इंग्लिश वारशाचे संवर्धन डोळ्यासमोर ठेवून करण्यात आले आहे, असे ऐतिहासिक इमारतीच्या संरक्षणासाठी कार्यरत एका संस्थेने सांगितले.