जिद्द, कष्ट, प्रामाणिकपणा, सौजन्य, ग्राहकसेवा या पंचसूत्रीमुळे उत्तुंग यश : मसालाकिंग डॉ. धनंजय दातार 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 05:53 PM2022-07-15T17:53:20+5:302022-07-15T17:56:08+5:30

डॉ. दातार यांनी लिहिलेल्या ‘मसालाकिंग - ए जर्नी ऑफ मेमॉयर्स’ या इंग्रजी आत्मचरित्राचे दुबईत प्रकाशन.

Great success due to determination hard work honesty courtesy customer service Masalaking Dr Dhananjay Datar book inauguration dubai | जिद्द, कष्ट, प्रामाणिकपणा, सौजन्य, ग्राहकसेवा या पंचसूत्रीमुळे उत्तुंग यश : मसालाकिंग डॉ. धनंजय दातार 

जिद्द, कष्ट, प्रामाणिकपणा, सौजन्य, ग्राहकसेवा या पंचसूत्रीमुळे उत्तुंग यश : मसालाकिंग डॉ. धनंजय दातार 

Next

दुबई : दुबईमध्ये ३८ वर्षांपूर्वी वडिलांनी थाटलेल्या लहानशा किराणा दुकानात मदत करायला मी भारतातून आलो तेव्हा माझ्या खिशात १० दिऱ्हॅमच्या केवळ तीन नोटा होत्या. या कर्मभूमीने माझी खडतर परीक्षा घेतली आणि त्या कसोटीला उतरताच भरभरून देऊही केले. जिद्द, कष्ट, प्रामाणिकपणा, सौजन्य व ग्राहकसेवा या पंचसूत्रीमुळेच मला व्यवसायात उत्तुंग यश लाभले आणि एका सामान्य दुकानदारापासून ते मसालाकिंग बनण्यापर्यंत माझा प्रवास झाला, असे प्रतिपादन अल अदील या जागतिक समूहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांनी दुबईत केले.

अल अदील समूहाच्या ३८व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून डॉ. दातार यांनी लिहिलेल्या ‘मसालाकिंग - ए जर्नी ऑफ मेमॉयर्स’ या इंग्रजी आत्मचरित्राचे प्रकाशन दुबईतील ॲड्रेस हॉटेलमध्ये प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांच्या हस्ते व केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत झाले. याप्रसंगी डॉ. धनंजय दातार यांच्या पत्नी वंदना, पुत्र हृषिकेश आणि रोहित यांच्यासह दुबईतील विविध क्षेत्रांतील मान्यवर, ‘अल अदील’चा कर्मचारीवर्ग व ग्राहक उपस्थित होते. 

डॉ. दातार म्हणाले, बालपण गरिबीत गेले. दहावीला मी गणितात पाच वेळा नापास झालो. वडिलांना अखेरच्या नोकरीत दुबईतील कंपनीतून निवृत्त होण्याच्या उंबरठ्यावर व्यवसायाची संधी दिसली. दुबईत गेलेल्या भारतीयांना पिठे, मसाले, लोणची, चटण्या तेथे सहज मिळत नाहीत हे लक्षात येताच त्यांनी एक लहानसे दुकान उघडले. बाबांची भागीदारीत फसवणूक झाल्याने त्यांना मदत करण्यासाठी मी दुबईला गेलो आणि उद्योजकता माझ्या आयुष्यात आली.

भारतीय तरुणांमधून हजारो उद्योजक निर्माण व्हावेत
आयुष्यात कोणतेही काम छोटे-मोठे नसते व पूर्वग्रह धंद्यात आणून चालत नाही, हा मोलाचा उपदेश मला एका जैन व्यापाऱ्याने केला. कामावर लक्ष केंद्रित करून मी आखाती देशांमध्ये ५० सुपर स्टोअर्सची साखळी विणू शकलो. यश व समृद्धीचे स्वप्न बघणाऱ्या भारतीय सर्वसामान्य तरुणांमधून हजारो उद्योजक निर्माण व्हावेत हे माझे स्वप्न आहे. अशा नवउद्योजकांना प्रेरणा मिळावी म्हणून मी आत्मचरित्र लिहिले आहे, असेही दातार म्हणाले.

Web Title: Great success due to determination hard work honesty courtesy customer service Masalaking Dr Dhananjay Datar book inauguration dubai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dubaiदुबई